सासवडमध्ये महाराष्ट्र केसरीसाठी २१ला निवड चाचणी स्पर्धा
सासवड, ता. १७ : महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा २०२५-२६ साठी पुरंदर तालुक्यातून मल्लांची निवड चाचणी कुस्ती स्पर्धा शनिवारी (ता. २१) सासवड (ता. पुरंदर) येथील श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या छत्रपती शिवाजी कुस्ती संकुल येथे आयोजित करण्यात आल्याची माहिती पुरंदर तालुका कुस्तीगीर संघाचे सचिव रवींद्रपंत जगताप यांनी दिली.
निवड चाचणी स्पर्धेच्या नियोजनाबाबत तालुका कुस्तीगीर संघाचे संस्थापक अध्यक्ष माजी आमदार संजय जगताप यांच्या सूचनेप्रमाणे सदस्यांची सासवडला बैठक झाली. वरिष्ठ आणि बालगटात या निवड स्पर्धा होणार आहेत. २१ फेब्रुवारीला सकाळी ९ ते १० या वेळेत स्पर्धकांचे वजन घेतले जाणार आहे. सकाळी १० ते सायंकाळी सातपर्यंत या निवड चाचणी स्पर्धा होणार आहेत. बाल गटातील स्पर्धा गादी विभागात तर वरिष्ठ गटातील स्पर्धा गादी आणि माती विभागात वजन गटनिहाय होणार आहेत. सर्व कुस्त्या प्रेक्षणीय होणार असल्याचे रवींद्रपंत जगताप यांनी सांगितले.
स्पर्धेसाठी वजनगट पुढीलप्रमाणे :
बालगट - २५ किलो, २८ किलो, ३२ किलो, ३६ किलो, ४० किलो, ४४ किलो, ४८ किलो, ५१ किलो, ५५ किलो आणि ६० किलो.
वरिष्ठ गट - गादी व माती विभाग - ५७ किलो, ६१ किलो, ६५ किलो, ७० किलो, ७४ किलो, ७९ किलो, ८६ किलो, ९२ किलो आणि ९७ किलो. महाराष्ट्र केसरी किताब गट ८६ ते १२५ किलो.
बालगटासाठी जन्म तारीख १ जानेवारी २०१२ ते ३१ डिसेंबर २०१५ पर्यंत असावी. वयाचा पुरावा म्हणून आधारकार्ड किंवा पासपोर्ट देणे बंधनकारक आहे. सहभागी होणाऱ्या मल्लांची जिल्हा कुस्तीगीर संघाकडे नोंदणी असणे आवश्यक आहे. नोंदणी नसल्यास जिल्हा कुस्तीगीर संघाकडे अर्ज व रजिस्ट्रेशन फी भरून नोंदणी करता येईल, असे सचिव जगताप यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

