तळेगावात प्रतिष्ठेची लढत

तळेगावात प्रतिष्ठेची लढत

Published on

तळेगावात प्रतिष्ठेची लढत

राज्यातील सत्तांतरानंतर तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या निवडणुकीत नव्या राजकीय घडामोडींना वेग आला आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकारण तापू लागले असून ही निवडणूक भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील प्रतिष्ठेची ठरणार आहे. सत्तांतर, पक्षांतर आणि नेतृत्वबदलामुळे तळेगावमधील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलली आहेत.
- विजय सुराणा
-------------------------------------
तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात राजकीय वातावरण तापले असतानाच मतदारांचा कल कोणत्या दिशेने झुकतोय, याबाबत चर्चांना उधाण आले आहे. रोजगार, शिक्षण आणि नागरी सोयी-सुविधांबाबत युवक प्रश्न विचारत आहेत; तर महिलावर्ग सुरक्षा, आरोग्य सेवा आणि महागाईच्या मुद्द्यांवरून सजग झाल्याचे दिसून येत आहे. सोशल मीडियावर भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही प्रमुख पक्षांकडून डिजीटल ‘रणांगण’ सजविले जात आहे. व्हिडिओ, प्रचार फेऱ्यांचे थेट प्रक्षेपण तसेच स्थानिक विकासावर थेट संवाद, अशा मोहिमा राबविल्या जात आहेत. नागरिक मात्र ‘फक्त घोषणा नव्हे; तर ठोस कृती आराखडा दाखवा’, अशी मागणी करत आहेत.


नगराध्यक्षपदासाठी चुरस
मागील निवडणुकीत भाजपने स्पष्ट बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली होती. त्यावेळी भाजपच्या चित्रा जगनाडे नगराध्यक्ष म्हणून निवडल्या गेल्या. भाजपचे १४ नगरसेवक, तळेगाव शहर सुधारणा व विकास समिती आणि जनसेवा विकास समितीचे प्रत्येकी सहा नगरसेवक निवडून आले होते. यंदा १४ प्रभागांमधून २८ नगरसेवकांची निवड होणार आहे. नगराध्यक्षपद हे सर्वसाधारण वर्गासाठी राखीव असल्याने निवडणुकीत चुरस वाढली आहे.
या निवडणुकीत आमदार सुनील शेळके, माजी मंत्री बाळा भेगडे आणि बापूसाहेब भेगडे यांच्या प्रतिष्ठेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

घोषवाक्याअंतर्गत जनसंपर्क
राज्यातील सत्तेत सहभाग असल्याने प्रशासकीय पाठबळ आणि विकास निधी मिळविण्याची क्षमता हे राष्ट्रवादी काँग्रेसचे बलस्थान मानले जात आहे. आमदार शेळके यांच्या समर्थकांनी ‘तळेगावचा विकास, अजितदादांची दिशा’ या घोषवाक्याखाली जनसंपर्क मोहीम सुरू केली आहे. भाजप मात्र सत्तेचा अनुभव आणि संघटनशक्तीच्या जोरावर पुन्हा सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. माजी मंत्री बाळा भेगडे यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपने ‘सातत्यपूर्ण विकास आणि पारदर्शक प्रशासन’ हे घोषवाक्य पुढे केले आहे. पाणीपुरवठा, रस्ते आणि नागरी सोयी-सुविधांवरील कामगिरी मतदारांसमोर मांडली जात आहे. मात्र, महायुतीत उमेदवारीवरून मतभेद स्पष्ट झाले आहेत. आमदार शेळके यांनी भाजपचे शहराध्यक्ष संतोष दाभाडे यांना महायुतीचा उमेदवार म्हणून जाहीर केले असले तरी, बाळा भेगडे यांनी ‘तो अधिकार त्यांना नाही’, अशी भूमिका घेतल्याने भाजपत अंतर्गत असंतोष वाढला आहे.

शिवसेनेचा मर्यादित प्रभाव
शिवसेनेच्या दोन्ही गटांचा व काँग्रेसचा मर्यादित प्रभाव काही प्रभागांत जाणवू शकतो. एकूणच ही निवडणूक भाजपसाठी सत्ता राखण्याच्या आणि राष्ट्रवादी काँग्रेसला सत्ता मिळविण्याच्यादृष्टीने प्रतिष्ठेची लढत ठरत आहे. तळेगावचा मतदार यावेळी विकास, स्थैर्य आणि कामगिरी या तीन मुद्द्यांवरच अंतिम निर्णय देईल, हे निश्चित मानले जात आहे.

स्थानिक मुद्देही निर्णायक
स्थानिक स्तरावर पाणीपुरवठा, वाहतूक कोंडी, करवाढ, कचरा व्यवस्थापन आणि अनियंत्रित बांधकामे हे प्रमुख प्रश्न आहेत. हेच मुद्दे यंदाच्या निवडणुकीत निर्णायक ठरण्याची चिन्हे आहेत. तळेगावचा मतदार आता अधिक जागरूक झाला असून पक्षनिष्ठेपेक्षा कामगिरी आणि विश्वासार्हतेवरच मत दिले जाईल, असा जनतेचा सूर आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com