
तळेगावातील मेळाव्यात शेतकऱ्यांना मार्गदर्शन
तळेगाव ढमढेरे, ता. ८ : शिरूर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे, कासारी, माळवाडी येथे शेतकरी मेळावे पार पडले. भारतीय किसान संघाच्या ४० व्या वर्धापन दिनानिमित्त पुणे जिल्हा भारतीय किसान संघातर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. मेळाव्यांमध्ये शेतकऱ्यांना ऊस लागवडीबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय किसान संघाचे पुणे जिल्हा अध्यक्ष ॲड.अशोक फडके होते. यावेळी ऊस लागवड कशी करावी, होणाऱ्या रोगांपासून उसाचा बचाव कसा करायचा याविषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. आपल्या शेतात ऊस बियाण्याचा मळा तयार करून बियाण्यांमध्ये होणारी फसवणूक टळू शकते, म्हणून प्रत्येक शेतकऱ्याने ऊस बियाणे मळा तयार करून स्वतःच्या शेतात रोपे तयार केली पाहिजे. यामुळे रोपांमध्ये होणारी फसवणूक टळू शकते असे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथील संपर्क अधिकारी प्रा. धर्मेंद्र फाळके यांनी सांगितले.
यावेळी प्रा.तुषार आहेर, ॲड. अशोक फडके, महाराष्ट्र प्रांतचे सदस्य भगवान फुलावरे, सतीश साकोरे, सूर्यकांत शिर्के, श्याम फुलावरे, आदित्य देशपांडे, विलास कुटे, मंगेश शेलार, सुरेश सूर्यवंशी, तालुका अध्यक्ष गणेश गावडे आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच शिरूर, इंदापूर, दौंड, जुन्नर, मावळ आदी तालुक्यातील कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते.
तळेगाव ढमढेरे, कासारी, माळवाडी येथील ग्राम समितीचे सदस्य व शेतकरी यांनी शेतकरी मेळाव्यासाठी विशेष परिश्रम घेतले.
राजाराम सूर्यवंशी यांनी प्रास्ताविक केले. गणेश गावडे यांनी आभार मानले.
04420