अजून किती घेणार निष्पापांचे बळी?

अजून किती घेणार निष्पापांचे बळी?

Published on

तळेगाव ढमढेरे, ता.१०: शिरूर तालुक्यातील शिक्रापूर-तळेगाव ढमढेरे-न्हावरा या रस्त्याने भरधाव जाणाऱ्या वाहन चालकांकडून गेल्या वर्षभरात अनेक लहान-मोठे अपघात होऊन निष्पाप नागरिकांचे नाहक जीव गेलेले आहेत. मार्गावर गतिरोधक, धोक्याच्या सूचनांचे फलकांची वाणवा दिसून येत आहे. यामुळे अजून किती जणांचे प्राण घेणार ? असा सवाल प्रवासी, स्थानिकांकडून विचारला जात आहे.

शिक्रापूर ते न्हावरा या ३५ किलोमीटरच्या रस्त्यावर आतापर्यंत वर्षभरात अनेक अपघात होऊन २० ते २५ प्रवाशांचा व स्थानिकांचा जीव गेला आहे. रस्त्यावरील वेगावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. याबाबत कोणतीही तरतूद केल्याचे दिसत नाही. तर शिक्रापूर-तळेगाव ढमढेरे या सतत रहदारी असणाऱ्या रस्त्यावर वाहनांच्या वेगामुळे गेल्या महिनाभरात चार अपघात होऊन सहा नागरिकांचा मृत्यू झाला आहे. यामुळे संबंधित विभागाने त्वरित उपाययोजना करण्याची मागणी प्रवासी, स्थानिकांकडून होत आहे.

शिक्रापूर महामार्गाचे नवीन डांबरीकरण झाल्याने चालक वेगात वाहने चालवतात. विशेष म्हणजे या मार्गावर विविध गावे, लोकवस्ती व चौक असल्यामुळे वाहनचालकांचे वाहनावरील नियंत्रण सुटून लहान मोठे अपघात होत आहेत. सुसाट वाहने चालवणाऱ्या वाहनचालकांवर कोणाचेच नियंत्रण नाही. चांगला रस्ता असल्यामुळे प्रत्येक जण ओव्हरटेक करून पुढे वाहने नेण्याच्या प्रयत्नात भीषण अपघात होत आहेत. दरम्यान, रस्त्यासंदर्भात बांधकाम विभागाशी संपर्क साधला परंतु तो होऊ शकला नाही.

तळेगाव ढमढेरे - न्हावरा या रहदारीच्या रस्त्यावर तोडकर वस्ती, माळवाडी, होमाचीवाडी, निमगाव म्हाळुंगी फाटा (ढोरे वस्ती), टाकळी भीमा चौक, घोलपवाडी, शिवतक्रार म्हाळुंगी, दहिवडी चौक, उरळगाव चौक, कुटे वस्ती आदी महत्त्वाच्या ठिकाणी गतिरोधक बसवून धोक्याच्या इशाऱ्याचे सूचनाफलक लावणे गरजेचे आहेत. प्रशासनाने त्वरित दखल घेऊन या रस्त्याची पाहणी करून जेथे लोक वस्ती, गाव, शाळा व चौक आहे अशा ठिकाणी गतिरोधक व सूचना फलक लावावेत, अन्यथा रास्तारोको आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल, असे शिरूर पंचायत समितीचे माजी सदस्य सुनील वडघुले यांनी सांगितले.


गतिरोधक, सूचनाफलक बसवा
शिक्रापूर - तळेगाव ढमढेरे रस्त्यावर ज्ञानवर्धिनी विद्यामंदिर, शिक्षक भवन व दुय्यम निबंधक कार्यालय, गीताई विष्णू मंगल कार्यालय, पेट्रोल पंप, प्राथमिक आरोग्य केंद्र, शासकीय गोदाम, विठ्ठलवाडी चौक या महत्त्वाच्या ठिकाणी गतिरोधक बसवावेत तसेच सूचनाफलक लावावेत, अशी मागणी माजी उपसरपंच ॲड.गणेश तोडकर, वकील संघटनेचे पदाधिकारी ॲड. सुहास ढमढेरे व ॲड. संपत ढमढेरे, ज्येष्ठ नागरिक श्रीकांत सातपुते व स्थानिक नागरिकांनी केली आहे.


तिघांचा अपघातात जखमी होऊन मृत्यू
शिक्रापूर - तळेगाव ढमढेरे या रस्त्यावर पीएमपीएमएल बस आणि दुचाकी यांची शुक्रवारी (ता.९) जोरात धडक होऊन झालेल्या अपघातात दुचाकीवरील तीन तरुणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या अपघातात प्रथमेश नंदकुमार शेलार, हर्षल दिगंबर घुमे ( दोघेही राहणार तळेगाव ढमढेरे) व आयुष अतुल जाधव (रा. कामशेत खडकाळ, ता.वडगाव मावळ) हे तिघेही युवक गंभीर जखमी होऊन त्यांचा अपघातात मृत्यू झाला आहे. त्यांच्या अपघाती मृत्यूमुळे तळेगाव ढमढेरे पंचक्रोशीतील नागरिकांनी हळहळ व्यक्त केली आहे.


शिक्रापूर रस्त्याच्या संदर्भात यापूर्वीही ‘‍सकाळ’मध्ये गतिरोधक व

विविध ठिकाणी सूचनाफलक लावावेत, अशा बातम्या प्रसिद्ध करून जनजागृती केलेली आहे. परंतु प्रशासनाने अद्याप दखल न घेतल्यामुळे अपघात होत आहेत.
- ॲड. संपत ढमढेरे, स्थानिक

07478, 07479, 07480

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com