तळेगाव ढमढेरे बंदला प्रतिसाद
तळेगाव ढमढेरे, ता. १८ : तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) या ऐतिहासिक व एकसंध गावाची जिल्हा परिषद गट व पंचायत समिती प्रभाग रचनेत दोन गटांत विभागणी झाल्याने संतप्त ग्रामस्थांनी शुक्रवारी गाव बंदची हाक दिली होती. या वेळी पूर्वीप्रमाणे गट ठेवावा तसेच दोन गटांत झालेली प्रभागांची विभागणी रद्द करावी, या मागणीसाठी मोर्चा काढून निषेध व्यक्त करण्यात आला. हनुमान मंदिर ते मुख्य बाजारपेठ आणि ग्रामपंचायत कार्यालय असे मोर्चाचे स्वरूप होते. यामध्ये ‘माझा गाव, माझा अभिमान’, तळेगाव ढमढेरे जिल्हा परिषद गट कायम ठेवा, प्रभागाची केलेली विभागणी रद्द करा, आदी घोषणा देण्यात आल्या. तसेच, काळीफित बांधून निषेधाची फलके नागरिकांनी हाती घेतली होती.
मोर्चानंतर ग्रामपंचायत कार्यालयासमोर विशेष ग्रामसभा घेण्यात आली. ग्रामविकास अधिकारी राजेंद्र सात्रस यांनी विशेष ग्रामसभेचा उद्देश सांगितला. ग्रामसभेतील ठरावाचे वाचन ॲड. गणेश तोडकर यांनी केले. ‘तळेगाव ढमढेरे जिल्हा परिषद गट कायम ठेवावा तसेच गावाची दोन जिल्हा परिषद गटांत झालेली विभागणी रद्द करावी’ असा ठराव सर्वानुमते करण्यात आला. २१ जुलैपर्यंत जिल्हाधिकाऱ्यांकडे हरकती नोंदविण्याचे सर्वानुमते ठरले. यावेळी ठरावाला वकील संघटनेने पाठिंबा दिला. तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार सचिन अहीर यांनी विधान परिषदेमध्ये लक्षवेधी मांडल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात आले. दरम्यान, शुक्रवारी तळेगाव ढमढेरे गाव दिवसभर कडकडीत बंद ठेवण्यात आले होते. सणसवाडी गटात प्रभाग क्रमांक एक आणि उर्वरित प्रभाग क्रमांक दोन ते सहा हे शिक्रापूर गटामध्ये समाविष्ट केले आहेत. ग्रामस्थ अन्यायकारक निर्णयाविरोधात एक आल्याबद्दल पुणे जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष ॲड. स्वप्नील ढमढेरे यांच्यातर्फे पेढे वाटप करण्यात आले.