तळेगाव ढमढेरेत रेबीज लसीचा तुटवडा
तळेगाव ढमढेरे, ता.३ : येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कुत्रा चावल्यानंतर देण्यात येणाऱ्या रेबीज लसीची नेहमीच कमतरता भासत असल्याची तक्रार विविध ठिकाणच्या ग्रामस्थांनी केली आहे. येथील प्राथमिक आरोग्य केंद्र व त्या अंतर्गत असलेल्या पाच उपकेंद्रात रुग्णांसाठी विविध उपक्रम राबविले जातात. येथील आरोग्य केंद्राची सुसज्ज इमारत व या इमारतीत विविध उपकरणांसह साहित्य उपलब्ध आहे. येथील आरोग्य केंद्रात स्वच्छतागृह, निवास व्यवस्था, पाणी व सोलरवर चालणारी वीज तसेच रुग्णांसाठी रुग्णवाहिका उपलब्ध आहे.
तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) प्राथमिक आरोग्य केंद्रात एकूण ३० कर्मचारी असून, ७ सेवकांची पदे रिक्त आहेत. वैद्यकीय अधिकारी म्हणून डॉ. संध्या कारंडे व डॉ. विनीत राठोड कामकाज पाहतात. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत एकूण ५२ आशा वर्कर असून, एक मुख्य गटप्रवर्तक आहे. आरोग्य केंद्रात दररोज सकाळी ९.३० ते १२.३० आणि दुपारी ४ ते ५ या वेळामध्ये ओपीडी सुरू असते. यामध्ये दररोज सुमारे २०० रुग्णांची तपासणी करून प्राथमिक औषधोपचार केले जातात. गंभीर आजार असेल तर शिक्रापूर येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवले जाते तसेच अति गंभीर आजार असेल तर ससून किंवा औंध येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये औषधोपचारासाठी पाठवले जाते.
प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णांची उत्तम सेवा केली जाते. रेबीज लसीसाठी वारंवार कमतरता भासते, मागणी जास्त आणि पुरवठा मर्यादित असतो त्यामुळे तुटवडा जाणवतो. लसीची कमतरता असली तरी केंदूर व शिक्रापूर येथील आरोग्य केंद्रातून रुग्णांसाठी मदत केली जाते. रात्रीच्यावेळी डॉक्टर, सिस्टर व शिपाई रुग्णांची सेवा करतात. विशेष म्हणजे प्रसुतीसाठी रात्रीची सेवा दिली जाते. प्रत्येक ग्रामपंचायतीने कुत्र्यांची लस व नसबंदी करणे गरजेचे आहे, यातून शिरूर तालुका रेबीजमुक्त होईल तसेच कुत्र्यांची संख्या आटोक्यात येईल. यासंदर्भात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे पत्रव्यवहार केलेला आहे.
- डॉ. संध्या कारंडे, वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र, तळेगाव ढमढेरे
प्राथमिक आरोग्य केंद्रात मला आवश्यक असणाऱ्या बीपीच्या गोळ्या एक महिन्यापासून उपलब्ध नाहीत, गेल्या वर्षभरापासून बीपीची गोळी सुरू आहे. आजही गोळी शिल्लक नाही, दोन दिवसात गोळी उपलब्ध होईल असे आरोग्य केंद्रातून सांगण्यात आले.
- बाळासाहेब बंड, रुग्ण
08310
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

