शिरूरमध्ये राष्ट्रवादीपुढे भाजपचे आव्हान कायम

शिरूरमध्ये राष्ट्रवादीपुढे भाजपचे आव्हान कायम
Published on

तळेगाव ढमढेरे, ता. १० : शिरूर तालुक्यात एकूण ७ जिल्हा परिषद गट व १४ पंचायत समिती गण आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस व भाजप यांच्यामध्ये तालुक्यात प्रथमच कडवी लढत झाली. काही गटामध्ये शिवसेना व अपक्षांनी आव्हान दिले होते. मतदारसंघामध्ये मोठ्या नेत्यांच्या एकही सभा झाली नाही. सर्व गटातील निवडणूक स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी हातात घेऊन प्रचार यंत्रणा राबविली होती.
कवठे यमाई- टाकळी हाजी, रांजणगाव गणपती- कारेगाव आणि पाबळ- केंदूर हे जिल्हा परिषदेचे गट आंबेगाव विधानसभेत आहेत. येथील दोन गटात कमळ फुलले असून, एका गटात राष्ट्रवादीला यश मिळाले आहे. त्यामुळे माजी मंत्री दिलीप वळसे पाटील व खासदार डॉ. अमोल कोल्हे, देवदत्त निकम यांना मोठा धक्का बसला आहे.
कवठे यमाई- टाकळी हाजी गटात माजी आमदार पोपटराव गावडे यांचे पुत्र व भाजपचे उमेदवार राजेंद्र पोपटराव गावडे यांनी प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी काँग्रेसचे दामू घोडे यांचा पराभव करून पहिल्यांदाच बेट भागात कमळ फुलवले असून, ५० वर्षाची सत्ता अबाधित राखली आहे. पंचायत समितीच्या दोन्ही गणात कमळ फुलल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे.
रांजणगाव- कारेगाव गटात भाजपच्या स्वाती दत्तात्रेय पाचुंदकर यांनी प्रतिस्पर्धी आपली जाऊ राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्योती मानसिंग पाचुंदकर यांचा पराभव करून दुसऱ्यांदा विजय खेचून आणला आहे. तसेच, या दोन्ही गणात भाजपचे उमेदवार विजयी झाल्याने भाजपचे नेते जिल्हा परिषदेचे माजी सदस्य चंद्रशेखर पाचुंदकर यांचे राजकीय वर्चस्व वाढले आहे. पत्नीच्या पराभवामुळे राष्ट्रवादीचे अध्यक्ष मानसिंग पाचुंदकर यांना मोठा धक्का बसला आहे.
केंदूर- पाबळ गटात राष्ट्रवादीचे प्रफुल्ल शिवले यांनी भाजपचे विकास गायकवाड यांचा सुमारे २० हजार मतांनी दणदणीत पराभव केला आहे. तसेच, पाबळ गणातून राष्ट्रवादीच्या वंदना प्रकाश पवार व केंदूर गणातून सुचेता रोहन थिटे यांनी भरघोस मतांनी विजय खेचून आणल्याने बाजार समितीचे माजी सभापती प्रकाश पवार यांना दिलासा मिळाला आहे.
शिरूर तालुक्यातील शिरूर ग्रामीण- न्हावरे गटात राष्ट्रवादीच्या वृषाली बबन वाळके यांनी निसटता विजय मिळवून माजी आमदार स्वर्गीय बाबुराव पाचर्णे यांच्या पत्नी मालती पाचर्णे (भाजप) यांचा पराभव केल्याने पाचर्णे समर्थकांना धक्का बसला आहे. या गटातील दोन्ही गणात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार निवडून आल्याने आमदार माउली कटके व पदाधिकाऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
शिक्रापूर- सणसवाडी गटात राष्ट्रवादीच्या मोनिका नवनाथ हरगुडे यांनी सुमारे २२ हजार मताधिक्य घेऊन अपक्ष उमेदवार सीमा त्रिनयन कळमकर यांचा पराभव केला. हरगुडे या पंचायत समितीच्या माजी सभापती आहेत. शिक्रापूर गणात राष्ट्रवादीचे रामभाऊ सासवडे यांनी भाजपचे पंढरीनाथ गायकवाड यांचा पराभव केला. सणसवाडी गणात एकमेव अपक्ष कोमल सत्यनारायण ढेरंगे या विजयी झाल्या आहेत.
तळेगाव ढमढेरे- रांजणगाव सांडस गटात पहिल्यांदाच कमळ फुलले असून, आमदार बापूसाहेब पठारे यांची कन्या दीपाली राहुल गव्हाणे यांनी जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य रेखा मंगलदास बांदल (राष्ट्रवादी काँग्रेस) यांचा पराभव केला. या गटात शिवसेनेच्या सारिका राहुल करपे व अपक्ष जयेश शिंदे यांनी कडवी झुंज दिली. तळेगाव ढमढेरे गणात भाजपच्या विद्या राजेंद्र भुजबळ, तसेच रांजणगाव सांडस गणात राष्ट्रवादीचे विजय सोमनाथ रणसिंग हे सलग दुसऱ्यांदा पंचायत समितीत निवडून आले आहेत. त्यांनी भाजपचे हनुमंत काळे यांचा पराभव केला. तर शिवसेनेचे राहुल रणदिवे यांनीही कडवी झुंज दिली आहे.
मांडवगण फराटा- वडगाव रासाई या गटाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. या गटात माजी आमदार अशोक पवार यांनी आपला गड अबाधित राखून विधानसभेच्या पराभवाची सल काढली आहे. या गटात त्यांच्या पत्नी सुजाता अशोक पवार राष्ट्रवादी काँग्रेस या दुसऱ्यांदा निवडून आल्या आहेत. त्यांनी आपले प्रतिस्पर्धी दादा पाटील फराटे यांचा पराभव केला आहे. या पंचायत समितीच्या दोन्ही गणात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले आहेत.

पक्षीय बलाबल
जिल्हा परिषद गट :- राष्ट्रवादी काँग्रेस -४ भाजप- ३.
पंचायत समिती:- राष्ट्रवादी काँग्रेस-८, भाजप -५, अपक्ष- १

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com