टाकळी हाजीत किराणा दुकान 
शॉर्ट सर्किटमुळे भस्मसात

टाकळी हाजीत किराणा दुकान शॉर्ट सर्किटमुळे भस्मसात

टाकळी हाजी, ता. २ : टाकळी हाजी (ता. शिरूर) येथील सागर किराणा स्टोअर्स या दुकानाला आग लागून दुकान आगीत भस्मसात झाले. यामध्ये अंदाजे २६ लाखाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. टाकळी हाजी गावात मळगंगा मंदिराशेजारी दत्तात्रय कांदळकर यांचे किराणा दुकान आहे. गुरुवारी (ता. २) पहाटे ४:३० वाजेच्या दरम्यान विजेच्या शॉर्ट सर्किटमुळे दुकानाला आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. गावात मळगंगा देवीच्या काठी व पालखीची मिरवणूक असल्यामुळे रात्री उशिरापर्यंत मिरवणूक सुरू होती. कांदळकर यांचे गावात वीस वर्षापासून जुने किराणा दुकान आहे. यात्रा असल्यामुळे किराणामालाचा साठाही मोठ्या प्रमाणात होता. पहाटे आग लागल्याचे दुकान मालक कांदळकर यांच्या लक्षात आल्यावर तातडीने शेजारी व ग्रामस्थांच्या मदतीने आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र आगीचा जोर जास्त असल्यामुळे प्रयत्न निष्फळ ठरला. तरी त्यांनी तातडीने गॅसच्या टाक्या बाहेर काढण्यात यश आल्याने मोठा अनर्थ टळला.
घटना समजताच माजी आमदार पोपटराव गावडे, घोडगंगाचे संचालक राजेंद्र गावडे, माजी सरपंच दामुशेठ घोडे यांनी भेट देऊन पाहणी केली. गावडे यांनी तत्काळ तहसीलदार बाळासाहेब म्हस्के यांना फोन करून मदत देण्याची विनंती केली. येथे विद्युत वितरणचे शाखा अभियंता राजेंद्र इंगळे, तलाठी डी. बी. चौधरी, ग्रामविकास अधिकारी राजेंद्र खराडे यांनी पाहणी करून पंचनामा केला. कांदळकर यांच्या कुटुंबाची मोठी आर्थिक हानी झाली असून, या संकटातून सावरण्यासाठी माजी आमदार पोपटराव गावडे यांनी ग्रामस्थांना आर्थिक मदत करण्याचे आवाहन केले.

टाकळी हाजी ः आगीत किराणा दुकान जळून मोठे नुकसान झाले. यावेळी पाहणी करताना माजी आमदार पोपटराव गावडे व ग्रामस्थ.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com