वरुडे येथे विशेष मतदार जनजागृती मोहीम

वरुडे येथे विशेष मतदार जनजागृती मोहीम

टाकळी हाजी, ता. ११ : आंबेगाव विधानसभा मतदारसंघाच्या पूर्व भागात मागील लोकसभा निवडणुकीत ५० टक्के पेक्षा कमी मतदान झालेल्या वरुडे (ता. शिरूर) येथे मतदार जनजागृती केल्याची माहिती आंबेगाव विधानसभा मतदार संघाच्या मतदार जनजागृती पथकाचे प्रमुख सुनील भेके यांनी दिली.
शिरूर लोकसभा मतदार संघ अंतर्गत १९६ आंबेगाव विधानसभा मतदार संघाचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी गोविंद शिंदे व तहसीलदार संजय नागटिळक, स्वीप नोडल अधिकारी सविता माळी, निवडणूक नायब तहसीलदार सचिन वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली आंबेगाव विधानसभा मतदार संघात मतदार जनजागृती अभियान सुरू आहे.
मागील २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत वरुडे गावात ५० टक्के पेक्षा कमी मतदान झाले होते त्याची प्रशासनाने दखल घेऊन आंबेगाव विधानसभा मतदारसंघात मतदार जनजागृती पथकाच्या वतीने वरुडे गावात लोकसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी म्हणून विशेष मतदार जनजागृती अभियान राबविले जात आहे. वरुडे गावात मागील लोकसभा निवडणुकीत १०८९ पैकी फक्त १०४ मतदारांनी मतदान केले होते. त्यामुळे आंबेगाव विधानसभा मतदार संघात वरुडे गावात सर्वात कमी ९. ५५ टक्के मतदान झाले होते. या लोकसभा निवडणुकीसाठी ६०१ पुरुष व ५४५ स्त्री असे एकूण ११४६ मतदार असून मतदानाची टक्केवारी वाढावी म्हणून त्या अंतर्गत वरूडे गावात आंबेगाव स्वीप पथकाच्या वतीने गृहभेटी करून प्रत्यक्ष मतदारांशी संवाद साधून त्यांना मतदान करण्याचे आवाहन केले. येथील बीएलओ प्रदीप डांगे यांनी घरोघरी मतदार स्लिपा वाटप केल्याची माहिती दिली. यावेळी पोलिस पाटील भाऊसाहेब शेवाळे, ग्रामसेवक सपना शिंदे, किसन फंड, विठ्ठल तांबे, खंडू गोरडे, राहुल अमाप, विकास बोऱ्हाडे, गोविंद जेधे, शंकर फंड, बाळासाहेब रोकडे, नामदेव हिंगे व इतर नागरिक उपस्थित होते. यावेळी मतदारांना मतदार मार्गदर्शिकेचे वाटप केले.
वरूडे येथील मतदारांना यापूर्वी ईव्हीएम व व्हिव्हिपॅट मशिनचे प्रात्यक्षिक दाखविले असून त्याबाबत जनजागृती केली आहे. यावेळी विनायक राऊत, सचिन तोडकर, काशिनाथ घोंगडे, तुषार शिंदे, अशोक लोखंडे, राहुल रहाटाडे, नारायण गोरे, सुरेश रोंगटे, अभिजित नाटे, मंगेश जावळे उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com