शिरूर तालुक्यात सौर पंपामुळे कांदा लागवड होणार सुकर
टाकळी हाजी, ता. १३ : विजेच्या भारनियमनाच्या कटकटीतून शेतकऱ्याला मुक्त करण्यासाठी शासनाने मागेल त्याला कृषी सौरपंप देण्याचा निर्णय घेतला. शिरूर तालुक्यात सातशे शेतकऱ्यांचे सौर पंप बसवले असून साडेतीन हजार नवीन पंपांना मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना सौर पंपाचा आधार मिळाल्याने यंदा कांदा लागवड काहीशी सुकर होणार आहे.
शिरूर तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात कांद्या पिकाची लागवड केली जाते. कांद्याची लागवड म्हटले की, सकाळी दहा ते सायंकाळी पाच या वेळेमध्ये मजुर शेतामध्ये कामासाठी येतात. या काळात कांदा लागवड करताना पाणी देणे गरजेचे असते, मात्र, अनेक वेळा विजेच्या भारनियमनाचा फटका कांदा लागवडीला बसतो. सध्या मजुरांची मोठी चणचण भासत असून ५०० ते ६०० रुपये दिवसाला देऊन कांदा लागवडीसाठी दहा ते पंधरा मजूर शेतामध्ये काम करतात. या काळात वीज गेल्यास शेतकऱ्याला सहा ते सात हजार रुपयांचा भुर्दंड सहन करावा लागतो. त्यामुळे अनेक सधन शेतकरी डिझेल इंजिन किंवा ट्रॅक्टर वर जनरेटरचा वापर करीत आहेत. मात्र, लहान शेतकऱ्यांना हे शक्य नसल्यामुळे त्यांना कांदा लागवडीसाठी मोठा त्रास सहन करावा लागत होता.
शिरूर तालुक्यात बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणात असून, रोज बिबट्याचे दर्शन नागरीकांना होत असते. अशा परिस्थितीत रात्री शेतकऱ्याला शेतामध्ये पाणी देताना जिवावर उदार व्हावे लागते. मात्र, सोलर पंपामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला. सध्या तरी किमान विहिरीवर सोलर पंप बसवून घेण्यासाठी शेतकरी प्रयत्न करीत आहेत. अनेक उपसा सिंचन योजना नदीवरून असून त्यासाठी १० हार्स पॉवरच्या पुढचे पंप बसवावे लागतात. मात्र, नदीच्याकडेला एवढ्या मोठ्या प्रमाणात सौर प्लेटसाठी जागेची उपलब्धता होत नाही. त्यामुळे नदीवर उपसा सिंचनासाठी सौलरची मागणी शेतकरी करीत नसल्याचे निमगाव दुडेचे शेतकरी भाऊसाहेब दुडे यांनी सांगितले .
शासनाने मागील त्याला सौर पंप देण्याची योजना जाहीर केल्यामुळे अशा शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून शिरूर तालुक्यात विहीर बागायत शेतावर शेतकऱ्यांनी सोलर पंप बसविले आहे. तालुक्यात सातशे शेतकऱ्यांनी सोलर पंप बसून ते कार्यान्वित झाले. शेतीला पाणी उपलब्ध होऊ लागले आहे. आता त्यांना पूर्ण दाबाने दिवसा वीज मिळत आहे. तसेच नवीन मागणी केल्यापैकी साडेतीन हजार शेतकऱ्यांचे पंप मंजूर झाले. तेही बसवण्याची प्रक्रिया मोठ्या वेगाने सुरू आहे. शेतकऱ्यांनी आवश्यक त्या कागदपत्रासह ऑनलाइन अर्ज करून सौर पंपाची मागणी केल्यास, दिवसा वीज मिळणार असून,पाहिजे तेव्हा शेतीला पाणी देणे शक्य होणार आहे.
- सुमीत जाधव, उपअभियंता, महावितरण, शिरूर
मागेल त्याला सौर पंप ही शासनाची योजना शेतकऱ्यांना दिवसा उपलब्ध करून देण्यासाठी अत्यंत फायद्याचे आहे. त्यासाठी शासन अनुदान देत आहे. सौर पंपामुळे शेतकऱ्यांना रात्री शेतीला पाणी देण्याच्या कटकटीतून मुक्तता झाली आहे.
- राजेंद्र गावडे, माजी संचालक, बाजार समिती, शिरूर
टाकळी हाजी (ता. शिरूर) ः बसविलेला सौर पंप.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

