जिल्हा परिषदेकडून शिरूरच्या विद्यार्थ्यांवर अन्याय

जिल्हा परिषदेकडून शिरूरच्या विद्यार्थ्यांवर अन्याय

Published on

टाकळी हाजी, ता. २ : इस्रो व नासा या अंतराळ संशोधन केंद्रांना भेट देण्यासाठी जिल्हा परिषदेमार्फत घेण्यात आलेल्या निवड चाचणी परीक्षेत शिरूर तालुक्याला जास्त मेरिट लावल्याने विद्यार्थ्यांवर अन्याय झाल्याची भावना पालक व्यक्त करीत आहेत. त्यामुळे सर्व तालुक्यांसाठी समान मेरिट करून शिरूर तालुक्यातील विद्यार्थ्यांना न्याय देण्याची मागणी पालक व विद्यार्थ्यांमधून होत आहे.
याबाबत प्राथमिक शिक्षण अधिकारी संजय नाईकडे यांनी दिलेल्या पत्रानुसार जिल्हा परिषद शाळेतील इयत्ता सहावी व सातवीतील विद्यार्थ्यांची २५ जुलैला एमकेसीएल मार्फत ऑनलाइन पद्धतीने निवड चाचणी क्रमांक-२ परीक्षा घेण्यात आली. यामध्ये एकूण एक हजार ५७१ विद्यार्थी परीक्षेत बसले होते. यामध्ये सर्वांत जास्त गुण प्राप्त केलेल्या १३ टक्के विद्यार्थ्यांची इस्रो व नासा या अंतराळ संशोधन केंद्रांना भेट देण्यासाठी निवड करण्यात आल्याचे शिक्षण अधिकाऱ्यांच्या पत्रात नमूद केले आहे. त्यामध्ये एकूण २३५ विद्यार्थी पात्र ठरले. यामधून नासा अंतराळ संशोधन केंद्रासाठी २५ विद्यार्थी, तर इस्रो अंतराळ संशोधन केंद्रासाठी ५० विद्यार्थ्यांची निवड करण्यात येणार आहे. त्यासाठी निवड चाचणी क्रमांक-३ ही तोंडी परीक्षा होणार आहे. त्यामधून ७५ विद्यार्थी निवडले जाणार आहेत.
दरम्यान, ऑनलाइन पद्धतीने झालेल्या या निवड चाचणी क्रमांक-२ परीक्षेसाठी संपूर्ण पुणे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचा सहभाग होता. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्याला एकच मेरिट लावणे गरजेचे होते, मात्र प्रत्येक तालुक्याला वेगवेगळे मेरिट लावून जिल्हा परिषदेने विद्यार्थ्यांवर एक प्रकारे अन्याय केल्याचे मत पालकांनी व्यक्त केले. तसेच शिरूर तालुक्यात सर्वाधिक मेरिट का, असा संतप्त सवालही काही विद्यार्थी व पालकांनी उपस्थित केला आहे. आम्ही स्वतः कष्ट करून अभ्यास करून चांगले गुण मिळविले आहेत. आमच्या शिक्षकांनीही जादा तास घेऊन आम्हाला परीक्षा देण्यासाठी चांगल्या दर्जाचे शिक्षण दिले आहे. मग दुसऱ्या तालुक्यांना जर कमी मेरिट असेल तेथील शिक्षक त्या विद्यार्थ्यांना शिकवत नाही का, त्यांचा शिक्षणाचा दर्जा चांगला नाही का, तेथील मुले अभ्यास करत नाहीत का, शिरूर तालुक्यातील विद्यार्थ्यांचा काय दोष... असे अनेक प्रश्‍न पालक नवनाथ रणपिसे यांच्यासह अनेक जण विचारत आहेत.

तालुकानिहाय मेरिट
शिरूर : ६२.५ टक्के,
बारामती : ५० टक्के,
राजगुरुनगर : ५० टक्के,
वेल्हा : ४५ टक्के,
हवेली : ४५ टक्के,
इंदापूर : ४५ टक्के,
आंबेगाव : ४२.५ टक्के
मावळ : ४२.५ टक्के
मुळशी : ४२.५ टक्के
भोर : ३७.५ टक्के
जुन्नर : ३७.५ टक्के
पुरंदर : ३७.५ टक्के
दौंड : ३७.५ टक्के

जिल्हा परिषदेने घेतलेल्या निवड चाचणी परीक्षेसाठी प्रत्येक तालुक्याला वेगवेगळी मेरिट लावली. यात सर्वांत जास्त मेरिट ही शिरूर तालुक्यासाठी होती. त्यामुळे येथील विद्यार्थ्यांवर अन्याय झाला आहे. विद्यार्थी हे समान असतात, त्यामुळे जिल्ह्यात सर्वत्र समान मेरिट असणे आवश्‍यक आहे.
- सुनीता गावडे, माजी जिल्हा परिषद सदस्या

Marathi News Esakal
www.esakal.com