लोणी काळभोरच्या लोकवस्तीत वासराचा फडशा
उरुळी कांचन,ता. ३१ : गोठ्यात दावणीला बांधलेल्या वासरावर बिबट्याने हल्ला करून त्याचा फडशा पाडल्याची घटना हवेली तालुक्यातील लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीतील बाजार मळा परिसरात बुधवारी (ता. ३१ डिसेंबर २०२५) सकाळी उघडकीस आली आहे. यामध्ये शेतकऱ्याचे सुमारे ५९ हजारांपेक्षा अधिक रुपयांचे नुकसान झाले आहे. या घटनेने परिसरात बिबट्याचा वावर असल्याचे निदर्शनास आल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.अमृत विठ्ठल काळभोर असे नुकसान झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. काळभोर यांचा बाजारमळा, जिल्हा परिषद शाळेच्या जवळ गायींचा गोठा आहे. नेहमीप्रमाणे मंगळवारी रात्री ५ गाई व ३ ते ४ महिन्यांचे १ वासरू, असे गोधन गोठ्यात बांधले होते. रात्री दहा वाजता काळभोर गोठ्यातील कामे आटोपून घरी गेले होते. बिबट्याने मंगळवारी (ता. ३०) रात्रीसुमारे सहा फूट भिंतीवरून गोठ्यात प्रवेश केला आणि दावणीला बांधलेल्या वासरावर हल्ला केला; परंतु वासरू बांधलेले दावे मजबूत होते ते तुटले नाही परिणामी बिबट्याला वासरू घेऊन जाता आले नाही; परंतु त्याच्या हल्ल्यात वासराचा जागेवरच मृत्यू झाला. काळभोर हे बुधवारी सकाळी गोठ्यात गेले तेव्हा त्यांना हा प्रकार निदर्शनास आला. त्यांनी तत्काळ लोणी काळभोर पोलिस ठाण्याशी संपर्क साधला. त्यानंतर पोलिस त्वरित घटनास्थळी पोहोचले आणि घटनेची माहिती वनविभागाला दिली. माहिती मिळताच लोणी काळभोरचे वन परिमंडळ अधिकारी प्रमोद रासकर, वनरक्षक अंकुश कचरे, वनमजूर तुळशीराम कोंढारी घटनास्थळी पोहोचले, त्यांनी पाहणी केली, परंतु गोठ्यात सिमेंट काँक्रिटचा कोबा केला असल्याने बिबट्यांच्या पाऊलखुणा तेथे मिळून आल्या नाहीत. येथून सुमारे ३०० फुटांवर लोकवस्ती असून तेथील १०० घरात सुमारे ४०० नागरिक राहावयास आहेत. बिबट्याच्या हल्ल्यात वासराचा मृत्यू झाला आहे हे लक्षात आल्यानंतर परिसरात बिबट्याचा वावर आहे हे लक्षात येताच शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. यापूर्वी कोरोना काळात रामदरा परिसरातील डोंगरात व्यायामासाठी जात असलेल्या अनेक नागरिकांना बिबट्याचे दर्शन झाले होते.
या घटनेचा पंचनामा करण्यात आला आहे. अहवाल वरिष्ठ कार्यालयास पाठवण्यात आला असून शासकीय नियमानुसार भरपाई मिळावी यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.
- प्रमोद रासकर, वन परिमंडळ अधिकारी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

