लक्ष्मीदर्शन तरच मतदर्शनाचा नवीन फंडा

लक्ष्मीदर्शन तरच मतदर्शनाचा नवीन फंडा

Published on

उरुळी कांचन, ता.२० : आजच्या निवडणुकीच्या बदलत्या समीकरणाची बीजे इतकी खोलवर रुजली आहेत की, यातून नेमकी लोकशाही जिवंत राहणार का आर्थिक हुकूमशाही येणार? असा सवाल या प्रक्रियेतून दूर असणाऱ्या सर्वसामान्य वर्गाला सध्या सतावत आहे. दरम्यान, लक्ष्मीदर्शन तरच मतदर्शन असा नवीन फंडा सुरू झाल्याने याचीच चर्चा या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हवेली तालुक्यात गाजत आहे.
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका जाहीर झाल्याने राजकीय वातावरण तापले असून हवेली तालुक्यातील समीकरणे, उमेदवारांचा धडक प्रचार आणि देवदर्शन-यात्रांच्या माध्यमातून रंगत वाढल्याचे चित्र स्पष्टपणे दिसत आहे. मात्र, यंदाच्या निवडणुकीत गावागावातील एक मोठा बदल प्रकर्षाने जाणवतो आहे. गावपुढाऱ्यांची मतदारांशी असलेली पारंपरिक पकड सैल झाली असून थेट उमेदवाराचा मतदारांशी संपर्क ही बाब निर्णायक ठरत आहे. पूर्वी गावातील वडीलधारी मंडळींनी आदेश द्यायचा त्याप्रमाणे मतदान व्हायचे. नंतरच्या काही काळांत गांवपुढाऱ्यांच्या निर्णयावर निवडणूक चालली; परंतु आता अयोध्या, काशी, उज्जैन, कोल्हापूर, ज्योतिबा, आदमपूर, पंढरपूर, तुळजापूर, अक्कलकोट, गाणगापूर आदी ठिकाणचे देवदर्शन वा पर्यटन, त्यानंतर लक्ष्मीदर्शन तरच मतदर्शन असा नवीन फंडा सुरू झाल्याने लोकशाहीत वावरणाऱ्या सर्वसामान्यांची ही निवडणूक राहिली नाही असेच म्हणावे लागले.
सध्या इच्छुक उमेदवारांचे दौरे थेट घराघरांत सुरू झालेले आहेत.सोशल मीडियावरून थेट संवाद वाढलेला दिसत आहे. तरुण,महिला आणि ज्येष्ठांसाठी स्वतंत्र बैठकांचे आयोजन, कोपरा बैठक, जाहीरनामा, मुद्द्यावर आधारित प्रचार यामुळे मध्यस्थी करणाऱ्या गावपुढाऱ्यांची भूमिका पूर्णपणे मागे पडली आहे. सोशल मीडियाचा प्रभावी वापर मतदारांचा विचार बदलतोय फेसबुक, इंस्टाग्राम, रील्स, युट्यूब, व्हॉट्सॲप ग्रुप यांद्वारे उमेदवारांकडून त्यांच्या कामांचा आढावा, प्रतिमा आणि घोषणापत्र थेट जनतेपर्यंत पोहोचत आहे. यामुळे माहितीचे केंद्रीकरण संपुष्टात आले असून उमेदवारांच्या प्रत्यक्ष कामावर आधारित चर्चांना उधाण आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com