‘बारकोड’मुळे बोगस प्रमाणपत्राचा भांडाफोड
थेऊर, ता. २१ : रिक्षा परमिट/बॅच मिळवण्यासाठी बनावट पोलिस चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र तयार करून शासनाची दिशाभूल केल्याचा धक्कादायक प्रकार कदमवाकवस्ती (ता. हवेली) येथील घोरपडे वस्ती परिसरात उघडकीस आला आहे. बार कोडने या फसवणुकीचा भांडाफोड झाला आहे. या प्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मैनुद्दीन हुसेन सय्यद (वय ५४, रा. घोरपडे वस्ती, कदमवाकवस्ती, लोणी काळभोर) व सचिन हरिभाऊ मगर, असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी सहायक फौजदार रामदास शंकर मेमाणे यांनी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रामदास मेमाणे हे मागील आठ महिन्यांपासून पोलिस चारित्र्य पडताळणी विभागात कार्यरत असून, ऑनलाइन पोर्टलवरून येणाऱ्या अर्जांची चौकशी करून त्याबाबतचा अहवाल वरिष्ठ कार्यालयाकडे सादर करतात. दरम्यान, १६ फेब्रुवारी २०२६ रोजी पुणे शहर विशेष शाखेकडून आलेल्या पत्रानुसार एका संशयास्पद पोलिस चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्राची तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले. संबंधित प्रमाणपत्रावर नमूद असलेला बारकोड क्रमांक संशयास्पद आढळला. तपासणी केली असता मूळ प्रमाणपत्रातील बारकोड विशिष्ट स्वरूपाचा असतो, मात्र सादर केलेल्या प्रमाणपत्रातील बारकोड वेगळ्या पद्धतीचा असल्याने ते बनावट असल्याचे स्पष्ट झाले.
याप्रकरणी चौकशी केली असता, मैनुद्दीन सय्यद यांनी यापूर्वी पोलिस चारित्र्य पडताळणीसाठी ऑनलाइन अर्ज केला होता. मात्र, त्यांनी राहत्या पत्त्याचा वैध पुरावा सादर न केल्याने त्यांचा अर्ज पोलीस ठाण्याकडून नामंजूर करण्यात आला होता. तरीही सय्यद यांनी बनावट प्रमाणपत्र तयार करून ते रिक्षा परमिट/बॅच मिळवण्यासाठी वाहतूक शाखेकडे सादर केल्याचे तपासात निष्पन्न झाले. हे प्रमाणपत्र घोरपडे वस्ती येथील सचिन हरिभाऊ मगर चालक असलेल्या ‘समृद्धी एंटरप्रायझेस (सीएससी)’ या केंद्रातून तयार करून दिल्याचे समोर आले.
त्यामुळे सरकारी यंत्रणेची फसवणूक करण्याचा प्रयत्न झाल्याचे स्पष्ट झाले असल्याने या दोघांविरुद्ध लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होताच लोणी काळभोर पोलिसांनी आरोपी सचिन मगर याला अटक करून न्यायालयात हजर केले. न्यायालयाने आरोपीला ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. ही कामगिरी साहाय्यक पोलीस निरीक्षक कृष्णा बाबर, पोलिस उपनिरीक्षक अनिल जाधव, साहाय्यक फौजदार रामदास मेमाणे, पोलिस हवालदार रामहरी वणवे, सागर जगदाळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

