कुंजीरवाडी परिसरात सातत्याने कोंडी
उरुळी कांचन, ता. २५ ः पुणे-सोलापूर महामार्ग क्रमांक ६५वर कुंजीरवाडी गावातील आळंदी म्हातोबाकडे व नायगाव पेठकडे जाणाऱ्या रस्त्यांच्या चौकामध्ये तसेच थेऊर फाटा चौकात सातत्याने वाहतूक कोंडीची डोकेदुखी झाल्याने महत्त्वाच्या कामासाठी जायचे असेल तर जे अंतर कापण्यासाठी अर्धा तास लागतो त्याठिकाणी जाण्यासाठी कोंडीमुळे किमान दीड ते दोन तास लागतात. या समस्येकडे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, पोलिस प्रशासन, स्थानिक ग्रामपंचायत प्रशासन दुर्लक्ष करत असल्याने या रस्त्यावरून पुण्याच्या दिशेला जाणारी व सोलापूरच्या दिशेला जाणाऱ्या वाहन चालकांची दमछाक होते. या वाहतूक कोंडीच्या कचाट्यातून रुग्णवाहिकाही सुटत नाहीत.
या पट्ट्यातील अनेक नागरिक किरकोळ कामासाठी देखील चारचाकी वाहनांचा वापर मोठ्या प्रमाणात करत असल्याने गरजेपेक्षा जास्त वाहने रस्त्यावर येण्याने या कोंडीत मोठी भर पडत असते. विशेष म्हणजे हे नागरिक वाहतुकीचे कोणतेही बंधन वा नियम न पाळता या दोन्ही चौकामध्ये वाहने आडवी लावून एकमेकाला अडचणीत आणण्याचे काम करतात. त्यामुळे सातत्याने वाहतूक कोंडी होते, मात्र पोलीस प्रशासन या बाबीकडे हद्दीचा वाद सांगत दुर्लक्ष करतात. या बाबीची जिल्हा प्रशासनाने दखल घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून शहर पोलीस व ग्रामीण पोलीस यांच्यामध्ये समन्वय घडवून आणत या वाहतूक कोंडी बद्दल जनतेला दिलासा देणारा मार्ग काढला पाहिजे अशी मागणी या रस्त्याने प्रवास करणाऱ्या नागरिकांकडून सातत्याने होत आहे.
या चौकातील वाहतूक कोंडीबाबत काही सुधारणा करण्याचा प्रस्ताव पोलिस प्रशासन व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्या समन्वयातून मुंबईला मंजुरीसाठी पाठवला आहे. अद्याप त्याला मंजुरी मिळाली नसल्याने, सध्या वाहतूक कर्मचाऱ्यांच्या जिवावरच तेथील नियोजन चालू आहे. पण त्याने समस्या थांबत नाही हे वास्तव आहे.
-राजेंद्र पन्हाळे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, लोणी काळभोर पोलिस ठाणे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

