गोडी पेरणाऱ्या मधमाश्यांचा मानवाशी कटू संघर्ष
जागतिक मधमाशी दिन विशेष
गणेश बोरुडे : सकाळ वृत्तसेवा
तळेगाव स्टेशन, ता. १९ : जैवविविधतेत मोलाचा हातभार लावणारी, मानवाच्या जीभेवर मधाची नैसर्गिक गोडी पेरणारी मधमाशी गेल्या काही वर्षांत स्वत:च्या अस्तित्वासाठी झगडत आहे. वृक्षतोडीमुळे नष्ट झालेला तिचा नैसर्गिक अधिवास, वातावरणातील बदल, बंदिस्त फुलशेती, कीटकनाशकांचा वाढता वापर आणि अज्ञानातून जाळले जाणारे तिचे मोहोळ आदी कारणांमुळे मधमाश्यांची संख्या दिवसेंदिवस घटत आहे. या सर्वाबाबत ‘जागतिक मधमाशी दिनानिमित्त घेतलेला हा आढावा...
‘‘मधमाशी पृथ्वीवरून नष्ट झाली, तर त्यापुढील फक्त चार वर्षे मानव तग धरू शकेल,’’ असे निरीक्षण वैज्ञानिक अल्बर्ट आइन्स्टाइन यांनी नोंदवून ठेवले आहे. समूह सहजीवनाचे प्रतीक असलेल्या मधमाश्या शेतीमधील परागीभवनासाठी उपयुक्त ठरतात. व्यावसायिक पद्धतीने मधमाश्यांची पोळी पिकामध्ये फुले येण्याच्या काळात ठेवल्यास उत्पन्नामध्ये लक्षणीय वाढ दिसली आहे. मात्र, इतर देशांत कायद्याने बंदी असलेल्या ‘निओनिकोटिनॉइड्स’ आणि ‘फिप्रोमिन’ प्रकारांतील कीटक नाशकांचा भारतात सर्रास वापर केला जातो. हा प्रकार या इवल्याशा जीवाच्या अस्तित्वावरच उठला आहे. त्यामुळे मधमाश्या वाचविणे, त्यांचे संवर्धन आणि मानवजातीचे मधमाश्यांपासून संरक्षण अशा दोन परस्पपूरक गोष्टींवर जागृती करणे काळाची गरज आहे.
मधमाश्यांचे काहीही चुकलेले नाही. जे काही चुकते ते मानवाचे. मधमाश्या मरत असतील, तर त्यांची जाणीव असलेले परदेशांतील लोक आंदोलन करतात आणि सरकारला त्यांची दखल घ्यावी लागते. तितकीच जागरुकता, जाणीव आपल्यालाही निर्माण करावी लागेल. त्यासाठी ठोस कृती कार्यक्रम हाती घ्यावा लागेल. मधमाश्यांची वाढ होण्यासाठी आपली छोटीशी कृतीदेखील फरक निर्माण करू शकते.
- प्रा. हेमंतकुमार डुंबरे, तज्ज्ञ प्रशिक्षक, केंद्रीय मधमाशी संशोधन आणि प्रशिक्षण संस्था, पुणे
मधमाश्यांचे हल्ले वाढताहेत
आठवडाभरापूर्वी मावळ तालुक्यातील नवलाख उंबरे येथील गावालगतच्या डोंगरावर मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या चौघांवर आग्यामोहोळाच्या मधमाश्यांनी केलेल्या हल्ल्यात एकाचा मृत्यू झाला, तर तिघे जखमी झाले. दुसऱ्या घटनेत जुन्नर तालुक्याच्या आदिवासी भागातील खडकुंबे येथील एका विवाह सोहळ्यात आग्या मोहोळाच्या मधमाशांनी वऱ्हाडावर हल्ला केला. अशा घटनांमध्ये सतत वाढ होते आहे.
मधमाश्या अचानक का चवताळतात?
तळेगाव दाभाडे येथील ‘फ्रेंड्स ऑफ नेचर’ संस्थेचे संस्थापक महेश महाजन म्हणाले, ‘‘उंच डोंगरकडा, जुनी उंच झाडे अथवा गगनचुंबी इमारतीच्या निर्जन ठिकाणी पोळे बांधणारी मधमाशी ही अत्यंत आक्रमक असते. मोहोळातील मध काढण्याचा अथवा मोहोळाला डिवचण्याचा प्रयत्न माणूस करतो. अशा ठिकाणी माणसाचा हस्तक्षेप जाणवला, तरच या माश्या चवताळतात आणि हल्ला करतात. विशेषतः आग्या मोहोळाच्या हल्ल्याने कधीकधी माणूस मृत्युमुखी पडतो.’’
मधमाश्यांचे पोळे जाळू नका...
‘‘शेती, अन्नधान्य, फळांचे उत्पादन हे मधमाश्यांद्वारे होणाऱ्या परागीकरणावर अवलंबून आहे. उशिरा का होईना शहाणपण सुचल्याने काही शेतकरी फळबागेत मधमाश्यांच्या पेट्या लावत आहेत. सरकार मधमाशांच्या संवर्धनासाठी कायद्यात कठोर तरतुदी करण्याच्या तयारीत आहे. मात्र, कायदा येईल तेंव्हा येईल, सध्या लोकांनीच याचे गांभीर्य लक्षात घ्यायला हवे. मधमाश्यांचे पोळे जाळू नये. आवश्यक असल्यास तज्ज्ञांच्या सल्ल्याने राणीमाशी व तिच्या टोळीला ईजा न पोचवता शास्त्रीय पद्धतीने पोळे काढता येते. त्यांचे पुनर्वसनदेखील करता येते,’’ असे महेश महाजन यांनी सांगितले.
आग्यामोहोळाची मधमाशी जास्त चिडखोर
‘‘भारतात आढळणाऱ्या मधमाश्यांच्या विविध प्रजातींमध्ये आग्यामाशी (रॉक बी) आणि फुलोरा (स्मॉल बी) या मधमाश्या चावऱ्या असतात. त्यातही फक्त आग्या मोहोळाची माशीच चिडखोर व रागीट असते. ती चवताळून हल्ला करते. मानवी दुर्गुणांमुळे होणारे बहुतांश हल्ले याच मधमाशीचे असतात. मानवी वस्तीच्या आजूबाजूला आढळणाऱ्या छोट्या मोहोळातील मधमाश्या क्वचितच धोकादायक असतात,’’ असे निरीक्षण अभ्यासकांनी नोंदवले आहे.
मधमाशी वाढीसाठी काय करता येईल...
- लवेंडर, मोहरी, सूर्यफूल, तण आणि रानफुलांचे रोपण आणि जतन करणे.
- शेती आणि बागेमध्ये रासायनिक कीटकनाशकांचा वापर टाळणे.
- मधमाश्यांना पिण्यासाठी उथळ भांड्यांसह पाण्याचे स्रोत तयार करणे.
- मधमाश्यांचे महत्त्व इतरांना पटवून सांगून जागृती करणे.
- स्थानिक मध आणि मधमाश्यांची उत्पादने खरेदी करणे.
मधमाश्यांचे हल्ले रोखण्यासाठी खबरदारी
- लाल, पिवळे किंवा भडक रंगांचे कपडे घालू नयेत.
- जंगलात फिरताना मद्यपान अथवा धूम्रपान टाळावे.
- जंगलात गोंधळ, गोंगाट टाळावा, जोरात गाणी लावू नये.
- जंगलातील मोहोळाला दगड अथवा काठीने डिवचू नये.
- मोहोळाचे फोटो काढताना फ्लॅशचा वापर करू नये
- जंगलात जाताना सुवासिक तेल, अत्तर वापरू नये
- आग्या मोहोळावर टॉर्च, तीव्र प्रकाशझोत चमकवू नये.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.