आधुनिक उपकरणांमुळे गजबजले ओतूर क्रिडासंकुलन

आधुनिक उपकरणांमुळे गजबजले ओतूर क्रिडासंकुलन

पराग जगताप, सकाळ वृत्तसेवा
ओतूर, ता. १० : येथील कपर्दिकेश्वर मार्गावर असलेले क्रिडा संकुलन ओतूर गावासोबतच नाही तर परिसरातील नागरिकांसह तरुणांसाठी वरदान ठरत आहे. या संकुलनामध्ये विविध प्रकारच्या खेळाच्या मैदानासह आधुनिक उपकरणे उपलब्ध असल्याने लहान मुलासह तरुण आणि ज्येष्ठ नागरिकांची येथे सकाळी व संध्याकाळ गर्दी होत आहे.

ओतूर येथील क्रिडा संकुलनात सुसज्ज असा जॉगिंग ट्रॅक आहे. ज्यावर नागरिक सकाळी व संध्याकाळी जॉगिंग करताना दिसून येतात. तसेच येथे लहान व मोठ्या मुलाना खेळण्यासाठी झोका, शिसवा, घसरगुंडी, क्लायमिंग रोप, बसून फिरण्यासाठी चक्री, लहान मुलाना आकर्षित करणारे हत्ती, बदक, घोडा यावर बसून खेळण्याची खेळणी आहे.

तर महिलांसाठी आधुनिक साहित्यासह स्वतंत्र सुसज्ज अशी जीम आहे. तर पुरुषांसाठी सुसज्ज अशी अद्ययावत उपकरणाची जीम आहे. तसेच सर्वांसाठी दहा व्यायाम प्रकार असलेली ओपन जीम ही येथे आहे. तसेच सिंगल बार व डबल बार ही वेगवेगळे आहेत. तसेच येथे मॅट कुस्ती व मॅट कबड्डी ग्राउंड आहे. तसेच ओपन कबड्डी ही खेळण्याची सोय आहे. तसेच इनडोअर फुटबॉल ग्राउंड, इनडोअर क्रिकेट ग्राउंड, इनडोअर क्रिकेट मध्ये सिजन बॉल नेट प्रॅक्टीस ग्राउंड, बास्केटबॉल ग्राउंड, स्केटिंग ट्रक, वॉली बॉलची दोन मैदाने, बॅडमिंटन ग्राउंड, गोळाफेक, कराटे व अद्ययावत नेमबाजी कक्ष आहे.

तर बंदिस्त हॉल मध्ये टेबल टेनिस, टेनिस कोर्ट, बुद्धिबळ, कॅरम, बॉक्सिंग साठी बॉक्सिंग बॅग, टर्न बॉल यासह इतर छोटे मोठे खेळ खेळण्याची सुविधा आहे. तसेच येथे पिण्याच्या शुध्द पाण्याची सुविधा उपलब्ध असून स्वच्छालय ही उपलब्ध आहे. ओतूर क्रीडा संकुलनात काही भागात काम सुरू असून भविष्यात येथे स्पर्धात्मक स्वीमिंग टॅक व रेन डान्सचे काम पूर्ण होणार असून मोठ्या शहरातील सर्व अत्याधुनिक स्पर्धात्मक खेळ येथे उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न सर्वांकडून सुरू आहे. ओतूर क्रिडा संकुलनात सर्व सुविधा व विविध प्रकारची खेळाची ग्राउंड आणि साहित्य हे खासदार, आमदार, जिल्हा परिषद, पंचायत समिती व
ग्रामपंचायतच्या माध्यमातून आणि काही बाबी लोकसहभागातून केल्या आहेत. हे सर्व क्रिडा संकुलन उभारण्यात गावातील आर्किटेक्ट, इंजिनिअर व क्रीडा शिक्षक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी विना मोबदला सेवा दिली आहे. तसेच येथे लावलेल्या सर्व झाडांची देखभाल व संगोपनाची जबाबदारी ग्रीन व्हीजन फाउंडेशन घेतली आहे.

प्रक्षिशीत शिक्षक वर्ग
ओतूर क्रीडा संकुलामध्ये विविध प्रकारच्या आधुनिक खेळांचे ग्राउंड साहित्यासह उपलब्ध केले आहे. मात्र कराटे, क्रिकेट व स्केटिंग सोडले तर इतर खेळासाठी येथे नियोजित असे प्रक्षिशीत शिक्षक किंवा मार्गदर्शकांचा अभाव दिसून येतो. त्यामुळे खेळाडूंना योग्य मार्गदर्शन मिळत नाही.


कचरा, दुर्गंधी व धूर
ओतूर क्रीडा संकुलच्यामागे मांडवी नदीच्या बाजूला स्मशानभूमी आहे. तसेच कचरा डेपो ही आहे. त्या कचरा डेपोतील कचऱ्याला पेटवून दिल्या नंतर कित्येक दिवस येथील धुराच्या त्रासाने क्रीडा संकुलनात येणारे नागरिक त्रस्त होतात. तसेच दुर्गंधी ही पसरली जाते. त्यामुळे येथील कचरा डेपोची व सर्व कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावून प्रसन्न वातावरण निर्माण करणे गरजेचे आहे.

मैदानावर होते अस्वच्छता
ओतूर क्रिडा संकुलनात विविध प्रकारचे खेळ खेळण्यासाठी तसेच फिरण्यासाठी नागरिक येतात. त्यामुळे होणाऱ्या कचऱ्याची स्वच्छता करण्यासाठी कोणतीच उपाय योजना दिसून येत नाही.

पार्किंगचा गंभीर प्रश्न
ओतूर शहरात नागरिकांची बदलत असलेली जीवनशैली पाहता येथील क्रीडा संकुलनात येणाऱ्या नागरिकांच्या वाहनांसाठी आगामी काळात सुसज्ज अशी पार्किंग व्यवस्था गरजेचे आहे.


क्रिडा संकुलन मागे असलेल्या कचरा डेपोत कचरा टाकायचा बंद केला आहे. तसेच भविष्यातील येथील गर्दी लक्षात घेता उत्तरेश्वर मार्गाचे काँक्रिटीकरण करून या मार्गावर पार्किंगची व्यवस्था करण्यात येणार आहे. तसेच येथील इनडोअर ग्राऊंडला आर्टिफिशियल ग्रास करणार आहोत. स्केटिंगचे अत्याधुनिक रबर कोटेड ग्राउंड बनवणार आहोत. लहान मुलासाठी इतर अत्याधुनिक खेळणी बसवण्याचे मानस आहे. मल्लखांब, उंच उडी व लांब उडीचे ही येथे अत्याधुनिक ग्राउंड करणार आहोत. तसेच इनडोअर पूल गेमची सुविधा उपलब्ध करून देणार आहोत. तसेच भविष्यात येथे सोलर उर्जाचे युनिट बसवणार आहोत. ज्येष्ठ नागरिक व लहान मुलासाठी जुने पारंपरिक खेळ येथे सुरू करण्याचा मानस आहे.
- छाया तांबे, सरपंच. - प्रशांत डुंबरे, उपसरपंच.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com