उन्हाळ्यात पाणीटंचाईची शेतकऱ्यांना भीती

उन्हाळ्यात पाणीटंचाईची शेतकऱ्यांना भीती

Published on

उंडवडी, ता. १६ : बारामती तालुक्यातील जिरायती भागाला दिलासा देणाऱ्या कऱ्हा नदीवरील पाच कोल्हापुरी बंधाऱ्यांवर लाखो रुपये खर्चून काम झाले आहेत. मात्र, त्यावर लोखंडी दरफ्या (ढापे) बसविण्याचे काम अद्याप रखडले आहे. परिणामी जळगाव कडेपठार परिसरात नदीतील हजारो लिटर पाणी विनाकारण वाहून जात आहे. रब्बी व उन्हाळी हंगामात पाणी टंचाईचे संकट उभे राहण्याची शक्यता आहे. यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
कऱ्हानदीवरील जळगाव कडेपठार, जळगाव सुपे, कऱ्हावागज, अंजनगाव आणि नेपतवळण आदी गावांच्या हद्दीतील नदीपात्रात हे बंधारे उभारण्यात आले आहेत. गेल्या वर्षी या पाच जुन्या बंधाऱ्यांचे नूतनीकरण करून त्यांना आधुनिक स्वरूप देण्यात आले. या भागातील शेती पूर्णपणे नदीच्या पाण्यावर अवलंबून आहे. या बंधाऱ्यांवर लोखंडी दरफ्या बसविण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. त्यामुळे मजूरखर्च, पाण्याची गळती आणि दरवर्षीचा देखभाल खर्च मोठ्या प्रमाणावर कमी होणार होता. मात्र दरफ्या बसविण्याचे काम अपूर्ण राहिल्याने या प्रकल्पाचा प्रत्यक्ष लाभ मिळालेला नाही.

नदीतील पाणी अडवून ते जमिनीत जिरवून विहिरींच्या पाण्याची पातळी वाढविण्याचा उद्देश या प्रकल्पामागे होता. पण दरफ्या नसल्याने हा हेतू अपूर्ण राहिला आहे. सध्या नदीतून मोठ्या प्रमाणावर पाणी वाहून जात असून, शेतकऱ्यांच्या डोळ्यासमोरच मौल्यवान पाणी निघून चालले आहे.

पाच बंधाऱ्यांमुळे सहा ते सात गावांतील सुमारे एक हजार ते बाराशे हेक्टर क्षेत्राला फायदा होतो. त्यामुळे पाटबंधारे विभागाने तातडीने लोखंडी दरफ्या बसवून पाणी अडवावे, ही आमची मागणी आहे.
पांडुरंग वाबळे, शेतकरी, जळगाव कडेपठार

कऱ्हानदीवरील बंधाऱ्यांचे सिव्हिल काम पूर्ण झाले आहे. मात्र गेट बसविण्याच्या तांत्रिक बाबी आणि निधीअभावी काम प्रलंबित आहे. या संदर्भात वरीष्ठ पातळीवर पाठपुरावा सुरू असून, लवकरच अडचणी दूर होतील आणि दरफ्या बसविण्याचे काम पूर्ण केले जाईल.
- व्ही. बी. नलवडे, सहाय्यक अभियंता (श्रेणी १)


03060

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com