उंडवडी - बारामती रस्त्याचे काम प्रगतिपथावर

उंडवडी - बारामती रस्त्याचे काम प्रगतिपथावर

Published on

उंडवडी, ता. १७ : उंडवडी कडेपठार ते बारामती- फलटण या महत्त्वाच्या मार्गाचे चौपदरीकरणाचे काम जोरात सुरू असून, सुमारे ८० टक्के काम पूर्णत्वाकडे गेले आहे. या रस्त्याचे दर्जेदार बांधकाम झाल्यास परिसरातील वाहतूक सुलभ होऊन प्रवासाचा कालावधी लक्षणीय घटणार आहे.
या प्रकल्पासाठी केंद्र सरकारने सन २०२२ मध्ये ७७८.१८ कोटी रुपये मंजूर केले आहेत. हा महामार्ग ३३.५ किलोमीटर लांबीचा रस्ता असून, त्यापैकी ११ किलोमीटर डांबरीकरण, तर २२.५ किलोमीटर कॉंक्रिट रस्ता तयार केला जात आहे. प्रकल्पात एक मोठा पूल, १४ छोटे पूल आणि दोन अंडरपास यांचा समावेश आहे.
उंडवडी कडेपठार ते बारामती या टप्प्यातील डांबरीकरणाचे काम अंतिम टप्प्यात असून, केवळ दोन ते अडीच किलोमीटरचे काम मेडद हद्दीत शिल्लक आहे. बारामती ते फलटण या भागात सिमेंट- कॉंक्रिटीकरणाचे काम बऱ्या‍च प्रमाणात पूर्ण झाले असून, खांडज व सांगवी हद्दीत सुमारे दोन किलोमीटरचे काम बाकी आहे. हा रस्ता संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाला जोडला गेला आहे.
हे काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या (एनएचएआय) देखरेखीखाली सुरू आहे. जमीन हस्तांतरण व निधी प्रक्रिया पूर्ण झाल्याने कामाला गती मिळाली आहे. संपूर्ण चौपदरीकरण पूर्ण झाल्यानंतर या रस्त्याचा दर्जा मोठ्या प्रमाणात सुधारेल आणि बारामती- फलटण दरम्यानची वाहतूक अधिक सुरक्षित व जलद होईल.

रस्त्यालगत व्यवसाय वाढणार
चौपदरीकरणानंतर वाहतुकीचा मोठा ओघ अपेक्षित आहे. त्यामुळे रस्त्यालगत अनेक ठिकाणी विविध व्यावसायिक बांधकामे सुरू झाली आहेत. येत्या काळात दुकाने, हॉटेल्स, सर्व्हिस सेंटर्स आणि मॉल्स उभे राहण्याची चिन्हे दिसत आहेत. यामुळे स्थानिक युवकांसाठी रोजगार आणि व्यावसायाच्या नव्या संधी निर्माण होत आहेत.

दृष्टीक्षेपात रस्ता
सुरक्षा, सोय आणि सौंदर्य यांचा समावेश.
रस्त्याच्या मध्यभागी दुभाजक व आकर्षक फुलांची झाडे लागवड.
गावाकडे जाणाऱ्या रस्त्यांवर वाहतूक नियत्रंक दिवे.
रस्त्यावर पांढरे पट्टे आणि रात्री चमकणारे परावर्तक लावले आहेत.
वेग मर्यादा दर्शवणारे फलक बसवले आहेत.
रस्त्यावरील वळणे कमी केली.

03071

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com