पुणे- सोलापूर महामार्गावर
धोक्याची टांगती तलवार!

पुणे- सोलापूर महामार्गावर धोक्याची टांगती तलवार!

सुवर्णा कांचन : सकाळ वृत्तसेवा
उरुळी कांचन, ता. १५ : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील बंद टोलनाका ते उरुळी कांचनदरम्यान तब्बल ४५० होर्डिंग आहेत त्यापैकी १० धोकादायक अवस्थेत उभे आहेत. याशिवाय महामार्गालगतच्या गावांमध्येही अनधिकृत होर्डिंगचे जाळे पसरले आहे. त्या बहुतांश होर्डिंगसाठी प्रशासनाची कोणतीही परवानगी घेण्यात आलेली नाही. त्यामुळे संबंधितांना नोटीस देऊन कारवाई करण्याचे संकेत पूर्व हवेलीतील गावांतील ग्रामविकास अधिकाऱ्यांनी दिले आहेत.
बंद टोलनाका ते उरुळी कांचन या दरम्यान महामार्गाच्या दोन्ही बाजूंना, तसेच अनेक मोठ्या प्रमाणात धोकादायक पद्धतीने होर्डिंग उभारले आहेत. त्यासाठी ग्रामपंचायत किंवा महामार्ग प्रशासनाकडून कोणतीही परवानगी घेण्यात आलेली नसल्याची माहिती समोर आली आहे. महामार्गावर मोठमोठे होर्डिंग लावून जाहिरात करण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. परिणामी पुणे- सोलापूर महामार्गाचे होर्डिंगने विद्रुपीकरण केले आहे. तसेच, चौकाचौकातील सार्वजनिक मालमत्तेवर बेकायदा जाहिरात फलक झळकत आहेत. महामार्गाच्या विद्रुपीकरणाकडे प्रशासनाचा काणाडोळा होत असल्याची खंत पूर्व हवेलीतील नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

धोदायक ठिकाणी पथाऱ्या
बऱ्याचदा जाहिरात नसतानाही लोखंडी सापळे धोकादायकरीत्या तशाच स्थितीत उभे असतात. पावसाळ्यापूर्वी येणाऱ्या वादळी वाऱ्याच्या पार्श्वभूमीवर या सापळ्यांचा पाया भक्कम आहे किंवा नाही, याबाबतची तपासणी केली जात नाही. महामार्गावर अनेक ठिकाणी महावितरण विभागाच्या विद्युत खांबांवर होर्डिंग आहेत. त्या खालोखाल अनेक पथारी व्यावसायिक कोणतीही तमा न बाळगता व्यवसाय करत आहेत. त्यांची संख्या मोठी आहे. अशा ठिकाणी दुर्घटना घडल्यास मोठी जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मुंबईत झालेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून त्वरित कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.

बंद टोलनाक्यावरही जाहिरात
कदमवाकवस्ती (ता. हवेली) येथील टोलनाक्याची टोलवसुली ३१ मार्च २०१९ मध्ये संपली, हा टोलनाका सध्या बंद अवस्थेत असून तो ‘एनएचआय’कडे वर्ग केला आहे. आता या टोलनाक्याचे लोखंडी अवशेष शिल्लक आहेत. त्यावर जाहिराती झळकवण्याचे काम जोरात सुरु आहे. या जाहिराती पाहण्याच्या नादात अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

परवाना दिलेले आकारमान आणि जागेवर होर्डिंगचे आकारमान यामध्ये खूप मोठी तफावत आहे. त्यामुळे उघडपणे शासनाची फसवणूक होत असताना प्रमाणपत्राची पडताळणी, बांधकामाचा दर्जा आणि प्रत्यक्षात जागेवर असणारे आकारमान याबाबत तपासणी करिता संबंधित प्रशासनाकडून विशेष मोहीम राबविण्यात आली पाहिजे. तसेच, संबंधित व्यावसायिकाने ‘होर्डिंग’च्या ‘स्ट्रक्चर स्टॅबिलिटी’चे प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे. परंतु, त्याची अंमलबजावणी होत नाही. त्याची पडताळणी करण्याची ही यंत्रणा सध्या ग्रामीण भागात अस्तित्वात नसल्याने याबाबत शासनाने कठोर कायद्याची अंमलबजावणी करावी.
- हरेश गोठे, सरपंच, कुंजीरवाडी (ता. हवेली)

पुणे- सोलापूर महामार्गावर होर्डिंगचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. सुदैवाने आमच्या गावालगत असणाऱ्या महामार्गावर अद्यप होर्डिंगबाबत कोणतीही मोठी दुर्घटना घडलेली नाही. या घटना टाळण्यासाठी ‘स्ट्रक्चर ऑडिट’सह संबंधित यंत्रणांची परवानगी घेऊन काळजी घेतली जाईल. मात्र, होर्डिंग लावणे अथवा न लावणे याबाबतचा कायदेशीर अधिकार आमच्याकडे नाही. त्यामुळे होर्डिंगबाबत दुर्घटना घडल्यास यास जबाबदार ग्रामपंचायत राहणार नाही.
- मंगेश कानकाटे, सरपंच, कोरेगावमूळ (ता. हवेली)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com