सापाला जीवदान देणारा अवलिया खलिल
उरुळी कांचन, ता. ३० : व्यवसायाने ट्रॅक्टर मेकॅनिक असणारे खलिल शेख सतरा वर्षांपासून उरुळी कांचनसह परिसरात सर्पमित्र आणि प्राणिमित्र म्हणून कार्यरत आहेत. आजपर्यंत त्यांनी शेकडो सापांना जीवदान दिलेले आहे. सापाबरोबरच लोक वस्तीत येणारे किंवा जखमी झालेले जंगली प्राणी त्यात हरिण, माकड, वानर, कुत्रा, सायाळ, उदमांजर किंवा इतर तत्सम सर्व प्रकारचे प्राणी, घुबड, घार, मोर, कावळा, कबुतर, मैना, टिटवी आणि इतर अनेक पक्षी पकडून त्यांना कात्रज सर्पोद्यान किंवा निसर्गाच्या सान्निध्यात सोडण्याचे काम ते करतात.
पूर्व हवेली परिसरात असणाऱ्या सापांमध्ये प्रामुख्याने मण्यार, घोणस, फुरसे आणि नाग या चार जाती आढळतात आणि निमविषारीमध्ये हरणटोळ, मांजऱ्या सारखे साप आहेत. बिनविषारीमध्ये धामण, दिवड, गवत्या तस्कर, डुरक्याघोणस, कवड्या, धुळनागिण असे साप आढळतात. सापांना जीवदान देण्याबरोबरच ते त्यांच्याविषयीची जनजागृती आणि प्रबोधनाचे काम करतात. आसपासच्या शाळेत, विविध कार्यक्रमात जाऊन सापाबद्दल माहिती सांगून विषारी, बिनविषारी सापांमधील फरक कसा ओळखायचा, साप चावल्यावर त्यावर काय आणि कसे प्रथमोपचार करायचे हे सांगतात. हे सर्व करत असताना लोकांच्या मनातील सापाविषयीच्या अंधश्रद्धा पण दूर करण्यात त्यांना चांगले यश मिळाले आहे.
प्रत्येक सजीव-निर्जीवांचे कार्य ठरलेले आहे. साप त्याच वर्तुळाचा एक भाग आहे. शेतकऱ्यांचा शत्रू असलेल्या उंदीर, घुशींना साप खातो म्हणून त्यांच्या संख्येवर अंकुश रहातो. सापाला शेतकऱ्याचा मित्र म्हणतात. जर सापांचे प्रमाण कमी झाले आणि उंदीर आणि तत्सम प्राण्यांचे प्रमाण वाढले तर नक्कीच निसर्गाचे वर्तुळ डळमळीत होईल. साप किंवा वन्य पशुपक्षी जर आपल्या परिसरात आले किंवा दिसले तर त्यांना त्रास देऊ नका, मारु नका. सर्पमित्र किंवा प्राणिमित्रांचे फोन नंबर आपल्या जवळ ठेवा, त्यांना फोन करा ते येऊन त्यांना घेऊन जातील.
- खलिल शेख, सर्पमित्र
सरकारकडून विमा, मानधनाची अपेक्षा
अनेक वर्षांपासून सर्पमित्र हे जीवाची काळजी न करता काम करत आहेत. त्यात काहींना आपले प्राण देखील गमवावे लागले आहेत. सरकार अनेक वर्षांपासून सर्पमित्रांसाठी विमा आणि मानधनाबाबत घोषणा करत आले आहेत. पण हे सर्व कागदावरच राहिले असून त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही. सरकारने त्यावर विचार करून सर्पमित्रांसाठी काहीतरी करावे, अशी अपेक्षा उरुळी कांचनसह परिसरातील सर्पमित्रांनी व्यक्त केली आहे.
खलिल शेख
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.