उरुळीत ग्रामपंचायतीवरच अतिक्रमणाचा आरोप

उरुळीत ग्रामपंचायतीवरच अतिक्रमणाचा आरोप

Published on

उरुळी कांचन, ता. ११ : येथील एका स्थानिक नागरिकाने आपल्या जागेवर ग्रामपंचायत प्रशासनानेच अतिक्रमण केल्याचा आरोप करून न्यायलयाकडे धाव घेत ग्राम सचिवालय बांधकामावर न्यायालयाकडून स्थगिती आणली होती. मात्र, ग्रामपंचायत प्रशासनाने ग्राम सचिवालय बांधकाम पूर्ण करून न्यायालयाने दिलेल्या आदेशाचा अवमान केला असल्याचा आरोप स्थानिक नागरिक विनोद शंकर माखीजा यांनी केला आहे. याबाबत त्यांनी मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी, गटविकास अधिकारी यांच्याकडे लेखी स्वरूपात तक्रार दाखल केली आहे.
माखिजा यांच्या लेखी तक्रारीत नमूद केले आहे की, त्यांच्या मालकीच्या सिटी सर्वे नं. १०८ या मिळकतीत ग्रामपंचायतीने आरसीसी ओके बांधकाम करून अतिक्रमण केले आहे. या संदर्भात पुणे येथील दिवाणी न्यायालयात (जुना रे मु . नं. १०३९/२०२२) नवीन स्पे मु. क्र. ३३१/२०२३ नुसार दावा दाखल करण्यात आला असून न्यायालयाने २० नोव्हेंबर २०२३ रोजी तूर्तास मनाईचे आदेश देऊन ग्रामपंचायतीला पुढील बांधकामावर बंदी घातली होती. ग्रामपंचायतीने न्यायालयाच्या आदेशाला दुर्लक्ष करत बांधकाम सुरूच ठेवल्याने मोठे आर्थिक नुकसानही झाले आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार नियुक्त केलेल्या कोर्ट कमिश्नर, उपअधिक्षक, भू- अभिलेख, यांनी सादर केलेल्या अहवालात ग्रामपंचायतीने सुमारे ७० चौ.मी. क्षेत्रावर अतिक्रमण केल्याचे स्पष्ट केले आहे.
याशिवाय, ग्रामपंचायतीने आपली अधिकृत जागा सोडून नैसर्गिक ओढ्यावरही बेकायदेशीरपणे भराव टाकून ग्रामसचिवालयाचे बांधकाम केले असून पर्यावरणाचीही हानी झाली आहे. या प्रकरणी राष्ट्रीय हरित लवादाकडे याचिका दाखल करण्यात येणार आहे. तसेच, या प्रकरणाची अतिशय गंभीर दखल घेऊन उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, असे लेखी तक्रारीत म्हटले आहे.
दरम्यान, उरुळी कांचन (ता. हवेली) येथे मुख्य बाजारपेठेत सन २०२२मध्ये ग्रामसचिवालयाचे बांधकाम सुरु झाले होते. बांधकामाशेजारी माखीजा यांची सिटी सर्वे क्रमांक १०८ नोंदीप्रमाणे १५८१ चौरस फूट ही जागा आहे. या जागेत ग्राम सचिवालय बांधकामाचे अतिक्रमण झाले. ही बाब माखिजा यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी न्यायालयात धाव घेतली. कोर्टाने ग्राम सचिवालय बांधकाम स्थगित करण्याचा आदेश दिला.
याबाबत ग्रामविकास अधिकारी प्रकाश गळवे यांच्याशी संपर्क साधला त्यांनी सदर बाब ही न्यायप्रविष्ट आहे. तसेच न्यायालयाच्या नियमाप्रमाणे काम सुरु असल्याचे स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com