उरुळी कांचन पोलिसांचा बनावट उत्पादनांवर छापा

उरुळी कांचन पोलिसांचा बनावट उत्पादनांवर छापा

Published on

उरुळी कांचन, ता. २८ : उरुळी कांचन (ता. हवेली) येथील एका दुकानात हार्पिक, लायसॉल अशा नामांकित कंपन्यांच्या बनावट उत्पादनांची विक्री होत असल्याने उरुळी कांचन पोलिसांनी कारवाई केली आहे. बुधवारी (ता. २७) सायंकाळी पाऊणे पाच वाजण्याच्या सुमारास केलेल्या कारवाईत पोलिसांनी सुमारे ५६ हजार १७० रुपयांची बनावट उत्पादने जप्त केली आहेत. याबाबत सर्फराज तांबोळी, (रा. पुणे) यांनी उरुळी कांचन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
याप्रकरणी उरुळी कांचन पोलिस ठाण्यात मनोज सुरेश लुंकड (वय ५२, रा. दातार कॉलनी, उरुळी कांचन, ता. हवेली) याच्यावर कॉपीराइट कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तांबोळी यांना उरुळी कांचन येथील महावीर एजन्सीतून बनावट हार्पिक, लायझोलची विक्री होत असल्याची माहिती मिळाली होती. याबाबत त्यांनी उरुळी कांचन पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शंकर पाटील यांच्याशी संपर्क साधला. तांबोळी यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे, उरुळी कांचन पोलिस पथकातील पोलिस उपनिरीक्षक मीरा मटाले, पोलिस हवालदार अजित काळे, ए. एम. राऊत यांनी महावीर छापा टाकून ५६ हजार १७० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच, महावीर एजन्सीचे मालक मनोज लुंकड याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान, फिर्यादी तांबोळी हे स्पीड सर्च अँड सिक्युरिटी नेटवर्क कंपनीचे अधिकृत प्रतिनिधी आहेत. रॅकेट बॅकायझर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा ग्राहक आहेत. कंपनीने पोलिसांच्या मदतीने उत्पादक- विक्रेत्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याचे अधिकार तांबोळी यांना दिलेले आहेत.

Marathi News Esakal
www.esakal.com