श्री कुरुंजाई माता ओटा मार्केट वापराविना बंद
विश्रांतवाडी, ता. ११ : आळंदी रस्त्यावरील कळसमधील श्री कुरुंजाई माता ओटा मार्केट डिसेंबर २०१६ पासून बंद अवस्थेत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या भाजीमंडईचे उद्घाटन केले होते. मात्र, इतकी वर्षे उलटून गेल्यानंतरही ही मंडई वापरात आणली गेलेली नाही.
दरवर्षी या ओटा मार्केटवर डागडुजीच्या नावाखाली लाखो रुपये खर्च केले जातात. मात्र प्रत्यक्षात नागरिकांना कोणतीही सुविधा मिळत नाही. सरकारी निधीचा हा अपव्यय थांबवावा आणि नागरिकांना ही सुविधा तातडीने उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी नागरिक करीत आहेत. सध्या ही जागा आरोग्य विभागाच्या कोठीसाठी दिली आहे. त्यामुळे त्यांच्या सामानासाठी ही जागा वापरण्यात येते.
यासंदर्भात आम आदमी पक्षाचे पुणे शहराध्यक्ष अमित म्हस्के यांनी प्रशासनाकडे याकडे लक्ष देऊन मंडई वापरात आणण्याची मागणी केली आहे.
याविषयी आरोग्य विभागाचे मुकादम अण्णा रास्ते म्हणाले की, आमच्या आरोग्य कोठीची दुरवस्था झाली होती. तिथे पावसात गळत होते. त्यामुळे आरोग्य विभागाला ही पर्यायी जागा म्हणून वापरण्यासाठी देण्यात आली. यासंदर्भात येरवडा क्षेत्रीय कार्यालयाचे क्षेत्रीय अतिक्रमण निरीक्षक सुभाष तळेकर म्हणाले की, ही जागा अतिक्रमण विभागाकडे आहे. अतिक्रमण कारवाईत पकडलेल्या विक्रेत्यांसाठी या ठिकाणी जागा देण्यात येणार होती. पण येथे ग्राहक आत येत नाहीत. त्यामुळे भाजीवाले आत बसण्यास तयार नाहीत. त्यामुळे येथे विश्रांतवाडीतील मच्छीमार्केट स्थलांतरित करण्यात यावा, असा प्रस्ताव आम्ही प्रभाग समितीसमोर ठेवला होता. परंतु त्याला स्थानिक नागरिकांचा विरोध झाला. त्यामुळे तेथे बाजार भरत नाही.
..........