नवले पूल सेवा रस्त्याची चाळण
धायरी, ता. ४ : मुंबई-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील नवले पूल परिसरातील सेवा रस्त्याची अत्यंत खराब अवस्था झाली आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून, वाहनचालकांना दररोज जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या दुर्लक्षामुळे या मार्गावरील वाहतूक धोकादायक झाली असून याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
या रस्त्याचा वापर पुण्यात ये-जा करणाऱ्या हजारो नागरिकांकडून केला जातो, मात्र रस्त्यावर पडलेले मोठे खड्डे, पावसामुळे त्यात साचलेले पाणी आणि वाहनांची गर्दी यामुळे येथे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. विशेषतः दुचाकीस्वार आणि प्रवासी वाहनचालकांसाठी ही परिस्थिती अत्यंत चिंताजनक ठरत आहे. स्थानिक नागरिकांनी आणि प्रवाशांनी वांरवार तक्रारी करूनही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून कोणतीही ठोस कार्यवाही होत नाही. दररोजच्या अपघातांमुळे वाहनचालकांचा जीव धोक्यात येत असल्याने नागरिकांमध्ये संतापाची भावना निर्माण होत आहे. तसेच या मार्गाची तातडीने डागडुजी करून रस्ता दुरुस्त करण्याची मागणी केली जात आहे.
नवले पूल सेवा रस्त्याची दुरवस्था झाली आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने सातत्याने दुर्लक्ष केल्यामुळे आता तेथील खड्ड्यांत पावसामुळे पाणी साचून राहत असल्याने वाहनचालकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. तातडीने डागडुजी न केल्यास मोठ्या दुर्घटनेची शक्यता नाकारता येत नाही.
- दत्तात्रेय पवार, नागरिक, नऱ्हे
मुंबई-बंगळूर महामार्गावरील नवले पूल सेवा रस्त्यावरील खड्डे तातडीने बुजविण्यात येतील.
- ओंकार जगदाळे, प्रकल्प अभियंता, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण