वन्यप्राण्यांमुळे डोंगर उतारावरील जमीन पडिक
उत्रौली, ता.२० : भोर तालुक्यातील वीसगाव खोरे, हिरडा मावळ खोऱ्यातील परिसर हा डोंगर उतारावर वसलेला आहे. येथील शेतकऱ्यांची उपजिविका शेतीवर चालते. डोंगर उतारावरील शेती वन्यप्राण्यांच्या प्रादुर्भावामुळे नेहमीच शेतीची नासधूस होत असल्याने अशा जमिनी पडून ठेवण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.
सह्याद्रीच्या डोंगर रांगेला मांढरदेव, महाबळेश्वर, पाचगणीची डोंगर रांग लागली असल्याने बिबट्या या हिंस्त्र प्राण्याबरोबर रानडुक्कर, गवा, हरिण, मोर, लांडगा, माकड, बेकर, ससे अशा प्राण्यांचा उपद्रव शेतीला होतो. खरिपात प्रामुख्याने भातनाचणी, सोयाबीन, भुईमूग, कडधान्ये, घेवडा व रब्बी हंगामात ज्वारी, गहू, हरभरा, कांदा पिके घेतली जातात. या परिसरात उदरनिर्वाह स्वरूपात शेती केली जात असल्याने जेमतेम उत्पादन शेतीतून मिळत असते.वन्यप्राण्यांच्या उपद्रवामुळे मोठ्या प्रमाणात पिकांची नासधूस होते पर्यायाने उत्पादन कमी येते.तसेच बिबट्या,लांडगा यांच्यामुळे गाई, म्हैस,बकरी असे पशुधन मारले जाते. नाइलाजास्तव शेती करणं परवडत नसल्याने शेतकऱ्यांचा डोंगर उतारावरील शेतजमीन पडून ठेवावी लागत आहे.
गेले पाच ते सहा वर्षे वन्यप्राण्यांचा त्रास, शेताची वजावणी, पेरणी, बेणणी, बियाणे, खते, औषधे, कीटकनाशके फवारणी यासाठी मोठ्या प्रमाणात खर्च करूनही एका रात्रीत रानडुकरे पीक नष्ट करतात. त्यामुळे खर्च, वेळ, श्रम वाया जाऊन हातात काहीच उत्पन्न येत नसल्याने गेले तीन वर्षे रब्बी हंगामातील पीक घेणे बंद केले आहे.
- श्याम वरे, शेतकरी, शेरताटी, वरोडी खुर्द (ता.भोर)
पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी वन विभागाकडे पीक नुकसानीसाठी अर्ज करावेत. वन विभागाकडून पिकांची पाहणी करून पंचनामे करण्यात येतील. नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना शासन नियमानुसार भरपाई देण्याची व्यवस्था करण्यात येईल.
- शिवाजी राऊत, वनपरिक्षेत्र अधिकारी भोर
भोर - १ मंडलातील गेल्या तीन वर्षात कमी झालेले पीक क्षेत्र (हेक्टरमध्ये)
खरीप पीक
वर्ष........भात........नाचणी........सोयाबीन........भुईमूग
२०२३-२४........३२५०........९७०........८०५........९८५
२०२४-२५........३१८०........९६५........९८५........९८०
२०२५-२६........३१२५........८९५........७९२........३६५
रब्बी पीक
वर्ष........ज्वारी........गहू........हरभरा
२०२२-२३........१२६७........५५४........४२४.५
२०२३-२४........१३५२........५४०........९७१
२०२४-२५........१३२९........४६३........३९२
भोर मंडल मधील गेले तीन वर्षातील वन्यप्राण्यांच्या प्रादुर्भावामुळे नुकसान झालेल्या भरपाईची प्रकरणे
वर्ष........शेत पीक........मनुष्य हानी........पशुधन
२०२२-२३........१३१........०........५२
२०२३-२४........३११........१........६६
२०२४-२५........३५४........०........५१
अशी आहेत डोंगर उतारावरील शेती कमी होण्याची कारणे
- वन्यप्राण्यांच्या प्रादुर्भाव
- वनविभागाकडून मिळणारी अत्यल्प नुकसान भरपाई
- वन्यप्राण्यांच्या प्रतिबंधासाठी शेतकऱ्यांकडे असणारी अपुरी सुविधा
- शासनाचे निर्बंध
- पावसाचा लहरीपणा
- वन्यप्राण्यांची झपाट्याने वाढलेली संख्या
00063
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

