

उत्रौली, ता. ३० : प्रत्येकाचे घराबद्दल एक स्वप्न असते. सुंदर, नीटनेटके घर असावे. कुटुंबाच्या स्वप्नातील घराला आकार देण्यासाठी केंद्र सरकारने पंतप्रधान जनमन आवास योजनेतून घरकुलासाठी दिली जाणारी रक्कम हातावरच पोट असणाऱ्या कुटुंबाला स्वप्नातील घर उभं करण्यास कमी पडते. अशा वेळी सरकारला समाजसेवी संस्थांची साथ मिळाल्यामुळे आदर्शवत घरकुल वसाहत निर्माण होऊ शकते. याचे उत्तम उदाहरण म्हणून वडगाव डाळ (ता. भोर) येथील कातकरी वस्ती होय.
या वसाहतीतील ३६ घरकुलांसाठी जिल्हा परिषद समाजकल्याण विभाग सांडपाणी व्यवस्थेसाठी ५ लाख, पंचायत समिती भोर मार्फत पाच सौर पथदिवे, ग्रामपंचायत अंतर्गत १५ टक्के मागासवर्गीय निधीतून रंगकाम मजुरी, जलजीवन मिशन अंतर्गत पिण्याच्या पाण्याची नळ जोडणी देण्यात आली आहे. मे २०२४ ते डिसेंबर २०२५ या कालावधीत ३६ घरकुलांची वसाहतीची उभारणी करण्यात आली.
पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकल्प संचालक शालिनी कडू, कोल्हापूर महापालिका उपायुक्त किरणकुमार धनवाडे, उपविभागीय अधिकारी डॉ. विकास खरात, गटविकास अधिकारी चंद्रकांत विपट, तहसीलदार राजेंद्र नजन यांनी वेळोवेळी प्रकल्पास भेट देत मार्गदर्शक व आवश्यक सूचना दिल्या.
सरपंच नवनाथ चौधरी, ग्रामपंचायत अधिकारी परमेश्वर खटके, एन. जी. ॲनालिटीक्स प्रायव्हेट लिमिटेड, परमनिश्चय संस्था प्रमुख सुशांत गुप्ता, उपाध्यक्षा मधुरा चौधरी, परमिंदर कौर, रोटरी क्लब बिबवेवाडी अंकुश पारख, वर्धमान गांधी, अमृता डुबे, सदस्य यांच्या सहकार्याने प्रकल्प पूर्णत्वास आला.
घरे बांधण्यासोबतच स्वच्छ पाणी, वीज, आरोग्य, शिक्षणाच्या सुविधा याकरिता सरकार व समाजसेवी संस्थांत समन्वय साधत उभारलेला हा आदर्श प्रकल्प इतर वस्त्यांसाठीही दिशादर्शक ठरेल. जिल्हा परिषद व रोटरी क्लब बिबवेवाडी यांच्यात ५०० घरकुलांच्या उभारणीसाठी सामंजस्य करार करण्यात आला.
-गजानन पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद पुणे
वडगाव डाळ येथील कातकरी वस्तीवरील घरकुल प्रकल्प राबवताना भौगोलिक दुर्गमता, साहित्याची उपलब्धता व बॅंक प्रक्रियेतील गुंतागुंत होती. सरपंच नवनाथ चौधरी, ग्रामसेवक परमेश्वर खटके, सदस्य यांच्या सहकार्याने घरकुल वसाहत उभारण्यात आली.
-चंद्रकांत विपट, गटविकास अधिकारी, भोर
कातकरी वस्तीत अनेकांची घरे कुडामेडाची, जुन्या साड्या, झोपण्यापुरता आडोसा, पोत्याचा वापर केलेली होती. पक्कं घर नसल्याने वीज नव्हती. पावसाळ्यात झोपडीवर टाकलेला प्लॅस्टिकचा कागद अचानक आलेल्या पावसाने, वाऱ्याने उडून जाई अशा अवस्थेत रात्र भिजत, कुडकुडत काढावी लागे. घरात सततच्या ओलीमुळे आजारी पडण्याचेही प्रमाण मोठे होते. आता पक्के सिमेंटच्या घरात सुखाची झोप येते.
-आशा पवार, लाभधारक, कातकरी वस्ती, वडगाव डाळ
असे उभे राहिले घर
-जिल्हा परिषदेच्या माध्यमातून बांधकामासाठी २ लाख अनुदान
-रोहयोतून मजुरी २८ हजार,
-स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत शौचालयाकरीता १२ हजार रुपयांचा निधी
-२६९ स्क्वेअर फूट सिमेंटचे पक्के घर
-पत्र्याचे सुरक्षित छप्पर
-बैठक कक्ष, शयनकक्ष, स्वयंपाक गृह, स्नानगृह, शौचालय
-सौर ऊर्जेवर वीज उपलब्ध
-लाभार्थ्यांना घरकुल आठ अ ची सपत्निक मालकी
समाजसेवी संस्थांचा हातभार
-एन. जी. ॲनालिटीक्स प्रा. लिमिटेड यांच्या सीएसआर फंड, परमनिश्चय संस्था, रोटरी क्लब बिबवेवाडी यांच्या वतीने लोखंडी पत्रे, स्टील ॲंगल, स्टाइल फरशी, शौचालय भांडे, विद्युत जोडणी,
दरवाजा, खिडक्या, कंपोस्टिक किट, सुशोभित कुंड्या यांचा पुरवठा
-प्रस्तावित योजना १ किलो वॅट सौर ऊर्जा युनिटचा विद्युत पुरवठा
-आशा पवार, नथू पवार यांनी स्वयंस्फूर्तीने घरकुल प्रकल्पातील लाभार्थ्यांच्या नावावर केली ११ गुंठे जागा
-बॅंक ऑफ महाराष्ट्र शाखा भोर यांच्या वतीने १ लाख ५० हजार रुपयांचा घरांसाठी रंग उपलब्ध
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.