एसटी बससेवेचा भोरमध्ये बोजवारा
उत्रौली, ता.९ : भोर तालुक्यातील वीसगाव खोऱ्यातील भोर-आंबाडे, भोर-वरोडी या मार्गावर २० गावांचा संपर्क साधला जातो. दररोज शालेय विद्यार्थी, व्यावसायिक अभ्यासक्रम तसेच महाविद्यालयीन शिक्षणाकरिता एसटी बसने प्रवास करतात. या मार्गावर ठराविक एसटी बस सुटतात त्याही वेळेवर येत नसल्याने विद्यार्थ्यांना शालेय नुकसानीस सामोरे जावे लागते आहे. विद्यार्थ्यांकडे मासिक पास आहेत; परंतु शिक्षणासाठी वेळेत पोहोचता येत नसल्याने खासगी वाहनाने प्रवास करावा लागत आहे. कोणतेही पूर्व सूचना न देता काही वेळेस अचानक एसटी बसेसच्या फेऱ्या रद्द करण्यात येतात त्यामुळे या मार्गावरील पालक, विद्यार्थी त्रस्त झाले आहेत.
भोर-वरोडी मार्गावर एसटी बस अवेळी येत असल्याने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम होण्याची शक्यता आहे. वेळेत एसटीची सुविधा उपलब्ध होत नसल्याने विद्यार्थ्यांना तासनतास बसची वाट पाहत बसावे लागत आहे. अभ्यास करण्याचा वेळ बसची वाट पाहत जात असल्याने विद्यार्थी, पालक यांच्यात नाराजीचा सूर उमटत आहे. सध्या हिवाळ्याचे दिवस असल्याने सूर्य लवकर मावळत असल्याने अंधार पडत असल्याने पालकांना आपला पाल्य घरी येईपर्यंत चिंता लागून राहत आहे. एसटी महामंडळाने योग्य कारवाई करीत एसटी बस वेळापत्रकानुसार सोडाव्यात.
मी अकरावीत शिकत असून आमच्या पोळवाडी गावापासून भोर ६ किमी अंतरावर आहे. अनेक वेळा अचानक एसटी रद्द केली जाते. त्यामुळे महाविद्यालयामधील प्रॅक्टिकल पूर्ण करून घरी जाण्याची अडचण होते. सकाळी बस नसल्याने खासगी वाहनाने किंवा वाहन न मिळाल्याने महाविद्यालय बुडते त्यामुळे शैक्षणिक नुकसान होते.
- आकांक्षा पोळ, विद्यार्थिनी, पोळवाडी (ता. भोर)
माझी दोन्ही मुले भोरला शिकायला जातात. त्यांचा एसटीचा मासिक पास काढला असून वेळेवर बस येत नसल्याने मुलांना जीव मुठीत धरून खासगी वाहनाने प्रवास करावा लागतो. मासिक पास असताना मुलांचे आर्थिक नुकसानी बरोबर शैक्षणिक नुकसान होत आहे. तसेच भोर नेरे मार्गे वरोडी एसटी बस नसल्याने रुग्णांना नेरे येथील रुग्णालयात, बँकेत तसेच सरकारी कागदपत्रांची पूर्ततेसाठी जावे लागते. यासाठी नेरे मार्गे बंद करण्यात आलेली भोर नेरे वरोडी एसटी बस पुन्हा सुरू करावी.
- विजय तुपे, पालक, वरोडी बुद्रुक (ता.भोर)
भोर आंबाडे, वरवडी, मांढरदेव या मार्गावर दिवसभरात एसटीच्या ५ फेऱ्या होतात. शालेय, महाविद्यालयीन पासधारक विद्यार्थ्यांची संख्या ३८० असून विशेषतः विद्यार्थ्यांसाठी शाळा, महाविद्यालयाच्या वेळापत्रकानुसार शाळेच्या वेळेत बसेस सोडण्यात येत आहेत. काही वेळेस तांत्रिक अडचणींमुळे वेळेत बदल होतो.
- रमेश मंता, आगार व्यवस्थापक, भोर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

