

उत्रौली, ता. ११ : वीसगाव (ता. भोर) खोऱ्यात भात शेतीला पूरक व्यवसाय म्हणून दूध उत्पादन व कुक्कुटपालन व्यवसाय केला जातो. हिवाळा ऋतू जनावरांच्या वाढीसाठी अत्यंत पोषक आणि उपयुक्त आहे. परंतु, कडाक्याची थंडी व गार वाऱ्यांमुळे जनावरांना विविध रोगाची लागण होऊन आजारी पडतात. त्यामुळे दुभत्या जनावरांच्या दूध उत्पादनात घट होते.
भोर तालुक्यात प्रामुख्याने भात शेती पीक घेतल्यानंतर पाण्याच्या अभावामुळे दुसरे पीक घेणे अवघड आहे. जेथे पाणी उपलब्ध तिथे ज्वारी, हरभरा, कांदा, गहू ही पिके अल्प प्रमाणात घेतली जातात. उपलब्ध चारा कमी, दुधाचा दर कमी, जनावरांच्या आरोग्यावर होणारा खर्च, पशुखाद्य महाग असल्याने वाढत्या महागाईने दुभती जनावरे सांभाळणेच अवघड झाले आहे. गाईच्या दुधाला प्रति लिटर ३५ रुपये, तर म्हशीला ५० रुपये बाजारभाव मिळत आहे. शेतकऱ्यांना गाईच्या दुधाला ५० रुपये, तर म्हशीच्या दुधाला ७० रुपये प्रति लिटर भाव मिळणे अपेक्षित आहे. तरच दुग्ध व्यवसाय तरू शकेल, असे शेतकऱ्यांचे मत आहे.
आपल्या भागात दुग्ध व्यवसाय हा पारंपरिक पद्धतीने करत असल्यामुळे उत्पादन व उत्पन्न यांचा मेळ घालताना शेतकऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. व्यापारी तत्त्वावर दुग्ध व्यवसाय केल्यास उत्पन्न चांगले मिळू शकते. दूध, शेणखत, गोमूत्र तसेच यापासून धूप, उदबत्ती बनवून उत्पन्नाची साधने निर्माण करता येईल. व्यावसायिक तत्त्वावर दूध उत्पादन करणे गरजेचे आहे.
- राजेश शेडगे, दूध उत्पादक, उत्रौली
हिवाळ्यात थंडीपासून बचाव करण्यासाठी उबदार व बंदिस्त गोठा, सकस संतुलित आहार, लसीकरण, गोचिडनाशकाची फवारणी या चतुःसूत्रीचा वापर केल्यास हिवाळा ऋतू जनावरांच्या आरोग्यासाठी चांगला आहे. त्यामुळे दुग्ध उत्पादन वाढते. जनावरे आजारी पडल्यावर तज्ञ पशुवैद्यकांच्या सल्ल्याने उपचार करावेत. त्यामुळे आर्थिक नुकसान टाळता येते.
- डॉ. किशोर मुळे, सहाय्यक आयुक्त, पशुसंवर्धन तालुका लघुपशू सर्व चिकित्सालय, भोर
हिवाळ्यात दूध व्यवसायात येणाऱ्या अडचणी
थंडीमुळे दुधाचे उत्पादन कमी
पशुखाद्य, चाऱ्याच्या खर्चात वाढ
गोचिड, पिसवा रक्तशोषण व जंतूची वाढ
थंडीमुळे जनावरांची रवंथ प्रक्रिया मंदावते
सडांना भेगा पडून दूध काढताना रक्त येते
जनावरे पाणी कमी पितात
हिवाळ्यात घ्यावयाची काळजी
तज्ञ पशुवैद्यकांच्या सल्ल्याने उपचार
हिरवा व वाळलेला चारा, जास्त खुराक
उबदार गोठा
सकाळी जनावरे धुणे टाळावे
दूध काढण्यापूर्वी व नंतर सड कोमट पाण्याने स्वच्छ करावेत
उर्जायुक्त आहार
गोठा बंदिस्त किंवा ताडपत्रीचा वापर
सकाळच्या कोवळ्या उन्हाचा जनावरे बांधावीत
पुरेसे स्वच्छ, शुद्ध पिण्याचे पाणी
योग्य मात्रेत खनिज क्षारांचा पुरवठा
मलमुत्राचा तत्काळ निचरा
जनावरांचे लसीकरण
गोठ्यात दर १५ दिवसांनी गोचिडनाशकाची फवारणी
सडांवर तत्काळ औषधोपचार
00146
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.