चित्रकला, हस्ताक्षराची आवड जोपासणारा शिक्षक

चित्रकला, हस्ताक्षराची आवड जोपासणारा शिक्षक

Published on

उत्रौली, ता. २२ : उत्रौली (ता. भोर) या गावाची ओळख शिक्षक आणि पोलिस दलातील कर्मचाऱ्यांचे गाव म्हणून आहे. याच गावातील कोठावळे, मोरे या कुटुंबातील प्रत्येकी १२ सदस्य हे शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहेत. कोठावळे कुटुंबातील हस्ताक्षराचे उपासक अजय सोनबा कोठावळे हे यातील एक. प्राथमिक शिक्षक असलेल्या अजय कोठावळे यांनी कायम सुंदर हस्ताक्षर व चित्रकलेची आवड जोपासली. आज त्यांचे विद्यार्थीही सुंदर हस्ताक्षराचे धडे गिरवत आहेत.
उत्रौलीत पहिली ते सातवीचे प्राथमिक शिक्षण घेत असताना अजय यांचे वडील सेवानिवृत्त मुख्याध्यापक कै. सोनबा कोठावळे हे शाळेचे तक्ते स्वतःच्या हस्ताक्षरात तयार करायचे. तेव्हा त्यांच्या शेजारी बसून अजय यांनी वळणदार व रेखीव अक्षरांचे लिखाण पाहत वयाच्या नवव्या वर्षी अक्षरांना वळण देण्यास सुरुवात केली. त्यांच्यात ती आवडच निर्माण झाली. वर्तमान पत्रातील जाहिरातींमधील अक्षरांचे वळण ते बोटाने, पेनाने गिरवू लागले. भोर येथील शिवाजी विद्यालयात माध्यमिक शिक्षण घेताना कलाशिक्षक किंद्रे यांच्यामुळे चित्रकलेच्या एलिमेंटरी व इंटरमिजिएट परीक्षेत ते उत्तीर्ण झाले. पुढे बारावीनंतर डी. एड. झाल्यावर १९९५ ला वडगाव (डाळ) येथे ते प्राथमिक शिक्षक म्हणून रुजू झाले. वडिलांप्रमाणेच शाळेचे तक्ते ते स्वतःच्या हस्ताक्षरात तयार करीत. आजतागायत ही कला अव्याहतपणे सुरू आहे.
कोरोनो काळात महुडे बुद्रुक येथे शाळेच्या भिंती बोलक्या करण्यासाठी अजय यांनी चित्रे काढून शाळा आकर्षक करण्याचा प्रयत्न केला. तर, सन २०२४-२५ मध्ये शिक्षक सक्षमीकरण स्पर्धेतील चित्रकला स्पर्धेत तालुक्यात प्रथम तर पुणे जिल्ह्यात द्वितीय क्रमांक मिळवला. आजही ते विद्यार्थ्यांना नवीन कल्पना, तंत्र यांचा वापर करून उत्तम संवादातून भावनांचा योग्य मेळ घालत शिस्तबद्धपणे हस्ताक्षर सुधारण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.

रंगकाम, शिल्पकला रेखाटनाचे बारकावे प्रत्यक्ष प्रात्यक्षिकाने समजावण्यावर मी भर देतो. विद्यार्थ्यांच्या गती आणि क्षमतेनुसार शिकवत कलेचे शिक्षण केवळ छंद न राहता करीअरची संधी व्हावी, यासाठी माझे प्रयत्न असतात.
- अजय कोठावळे, शिक्षक.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com