बाजारवाडीच्या यात्रेत वनभोजनाचा आनंद

बाजारवाडीच्या यात्रेत वनभोजनाचा आनंद

Published on

उत्रौली, ता. २६ : बाजारवाडी (ता. भोर) येथे ग्रामस्थ आणि यात्रा कमिटी आयोजित ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ देवाची यात्रा उत्साहात साजरी करण्यात आली. मंगळवारी (ता .२४ ) सकाळी अभिषेकाने प्रारंभ झालेल्या या यात्रेला पंचक्रोशीतील भाविक, मुंबई-पुण्यातील चाकरमानी, लेकुरवाळी, सासुरवाशीण उपस्थित होत्या.
वनभोजनाची परंपरा
सायंकाळी गावशिवारात शेकडो वर्षांची परंपरा असलेले वनभोजन झाले. महिलांनी पुरणपोळीचा खास बेत केला होता. प्रत्येक घरातून पुरणपोळी, गुळवणी, आमटी, भात अशा पदार्थांची पाटी घेऊन महिला वनभोजनासाठी आल्या. ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ, जोगेश्‍वरी देवीची पालखी तसेच श्री काळ भैरवनाथ, जानूबाई, भवानीआई, वाघजाई माता यांच्या मानाच्या काठ्या गाव शिवारात ढोल-लेझीमच्या तालावर आणण्यात आल्या. ‘नाथ साहेबाच्या नावानं चांगभलं’, ‘काळभैरवनाथाच्या नावानं चांगभलं’ या जयघोषात आरती करून पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून वनभोजनास प्रारंभ झाला.
सामुदायिक वनभोजन
नातेवाईक, पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी एकत्र बसून निसर्गाच्या सानिध्यात रुचकर जेवणाचा स्वाद घेतला. या परंपरेमुळे ग्रामस्थांमध्ये आपुलकी, एकोपा वाढतो. सुख-दुःखांची देवाणघेवाण होते. तसेच निसर्गाची जपणूक करण्याची जाणीव निर्माण होते. तसेच वनभोजनाच्या परंपरेतून सामुदायिक एकोपा, निसर्गप्रेम आणि सांस्कृतिक वारसा जपला जातो.
सायंकाळी भैरवनाथ मंदिरात श्री काळभैरवनाथ गोंधळी कथा सांगण्यात आली. रात्री छबीना मिरवणुकीत फटक्यांची आतषबाजी करण्यात आली. ढोल-लेझीम स्पर्धाही रंगली. यामध्ये प्रथम क्रमांक केळजाई माता ढोल-लेझीम संघ, वाई (१५ हजार व ढाल) यांनी पटकाविला. द्वितीय जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, बाजारवाडी (१० हजार व ढाल), तृतीय क्रमांक श्रीकृष्ण ढोल-लेझीम संघ, हरतळी (८ हजार व ढाल) यांनी पटकाविला.
बुधवारी (ता. २५) सकाळी १० ते दुपारी ३ पर्यंत महादेवराव मनवकर लोकनाट्य तमाशा मंडळाने प्रेक्षकांची मने जिंकली. सुजय तनपूरे आणि महादेव कचरे यांच्यात झालेल्या लढतीत सुजय तनपूरे यांनी विजय पटकावीत ‘श्री काळभैरवनाथ केसरी’ मानाची चांदीची गदा आणि ५१ हजार रुपयांचे इनाम पटकावले. कुस्तीच्या मैदानात मल्लांनी शौकीनांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. यात्रा कमिटी आणि ग्रामस्थांनी यात्रेचे नियोजन यशस्वी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com