तुकाबांच्या पालखीकडून रोटी घाट सर
पाटस (ता.२५) : ऊन सावलीचा खेळ... त्यातच होणारा पावसाचा शिडकावा... हातात भागवत धर्माच्या पताका... टाळमृदगांचा गजर... मुखी विठू नामाच्या जयघोषात. अशा मंत्रमुग्ध झालेल्या भक्तीमय वातावरणात जगतगुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याने बुधवारी (ता.२५) दौंड तालुक्यातील रोटीच्या घाटाच्या नागमोडी वळणाचा अवघड टप्पा पार केला.
संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा वरवंड येथील मुक्काम आटोपून विसाव्यासाठी बुधवारी (ता.२५) पाटसकडे मार्गस्थ झाला. सकाळी नऊ वाजता पाटस हद्दीत सोहळा लाखो भाविकांसह मोठ्या दिमाखात दाखल झाला. ग्रामपंचायत पदाधिकारी, प्रमुख व्यक्ती यांच्या हस्ते पूजन करून पालखी नागेश्वर मंदिरात दर्शनासाठी ठेवण्यात आली.
यावेळी दौंडसह, शिरूर, श्रीगोंदा, कर्जत आदी तालुक्यातून मोठ्या संख्येने नागरिक दर्शनासाठी आले. गावातील अनेकांनी वारकऱ्यांसाठी जेवणाची, चहा-नाष्ट्याची सोय केली. विसाव्याच्या नियोजित वेळेनंतर सकाळी अकरा वाजता पालखी रोटी घाटाकडे मार्गस्थ झाली. यावेळी पालखी मार्गावर अनेक दानशूरांनी वारकऱ्यांसाठी अन्नदान, नाष्टा व पाण्याची सोय केली.
घाटात पालखी सोहळा पाहण्यासाठी गर्दी
संत तुकाराम महाराज पालखीचे रोटीच्या नागमोडी घाटात आगमन होताच पहिला अवघड टप्प्पाच्या सुरुवातीला पालखीरथाला सात बैल जोड्या लावण्यात आल्या होत्या. त्यानंतर मोठया उत्साहात पहिला टप्पा पार केला व पालखी सोहळा दुसऱ्या टप्यातील अवघड वळणावर आला. विठू नामाचा गजर करीत, कधी फुगडी तर कधी उड्या मारीत वारकरी बेभान झाले होते. घाटात पालखी सोहळ्या पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होती.
दुसऱ्या टप्यातील घाटाचे विलोभनीय दृश्य पाहण्यासाठी घाटात भक्तीचा मळा फुलला गेला होता.
भक्तीमय वातावरणात अंदाजे दोन किलोमीटरच्या घाटाचा नागमोडी टप्पा पार करून सोहळा रोटी गावाकडे मार्गस्थ झाला. दुपारी रोटी हद्दीत ग्रामस्थांच्या वतीने पालखीचे पूजा, अभंग व आरती करून स्वागत करण्यात आले. त्यानंतर भाविकांच्या दर्शनासाठी पालखी विसाव्यासाठी ठेवण्यात आली. नियोजित वेळेनंतर पालखी सोहळा हिंगणीगाडा बसस्थानक परिसरात दाखल झाला. यावेळी ग्रामस्थांकडून पालखीचे पूजन करण्यात आले. यावेळी परिसरातील नागरिकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. याठिकाणी अर्धातासाच्या विसाव्या नंतर सोहळा वासुंदे व त्यानंतर बारामती हद्दीकडे मार्गस्थ झाला.
00540
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

