पाटसमध्ये तलावात आढळला मृतदेह
पाटस, ता. १९ : पाटस (ता. दौंड) येथील तलावातील पाण्यात एका अज्ञात तरुणाचा मृतदेह आढळून आला. मृतदेहाचे पाय बांधलेल्या अवस्थेत असल्याने नागरिकांमध्ये घातपाताचा संशय बळावला आहे.
याबाबत पाटस पोलिस म्हणाले, ‘‘पाटस येथील महामार्गालगत गावतलाव आहे. शुक्रवारी सकाळी तलावातील पाण्यात एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. माहिती मिळताच पाटस पोलिस चौकीचे सहायक पोलिस निरीक्षक प्रवीण संपांगे, सहायक पोलिस उपनिरीक्षक महेंद्र फणसे, पोलिस हवालदार कानिफनाथ पानसरे, पोलिस नाइक गणेश मुटेकर यांनी घटनास्थळी धाव घेतली. नागरिकांच्या मदतीने मृतदेह पाण्यातून बाहेर काढला. यावेळी मृतदेहाचे पाय तारेने घट्ट बांधल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे नागरिकांनी घातपाताचा संशय वर्तविला आहे. शवविच्छेदनासाठी वरवंड आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. योगिता तोडमल या आरोग्य पथकासह घटनास्थळी हजर झाल्या. मात्र, मृतदेह पुर्णत: सडलेल्या अवस्थेत असल्याने शवविच्छेदनासाठी यवत येथील ग्रामीण रुग्णालय येथे पाठविण्यात आला आहे.
संबंधित व्यक्तीचे अंदाजे वय ३५ असून मध्यमबांधा, अंगात काळा, चौकडी शर्ट, निळ्या रंगाची पॅंट परिधान केली आहे. याबाबत कोणाला काही अधिक माहिती मिळाल्यास मोबाईल क्रमांक ९५९५७६२८५४ यावर संपर्क साधावा असे आवाहन पोलिसांनी केले आहे.