तापमानाचा कहर; पण येईना ‘इलेक्शन फिव्हर’

तापमानाचा कहर; पण येईना ‘इलेक्शन फिव्हर’

तापमानाचा कहर; पण येईना ‘इलेक्शन फिव्हर’

मावळ तालुक्यातील स्थिती; उमेदवार स्थानिक नसल्याने निवडणुकीचा माहोल तयार होईना

ज्ञानेश्वर वाघमारे : सकाळ वृत्तसेवा
वडगाव मावळ, ता. ३ : लोकसभा निवडणुकीला जेमतेम आठ दिवसांचा कालावधी राहिलेला असतानाही मावळ तालुक्यात अद्याप प्रचारात रंगत निर्माण झालेली दिसून येत नाही. उमेदवार मावळ तालुक्यातील स्थानिक नसल्याने तालुक्यात अद्याप निवडणुकीचा माहोल तयार झालेला दिसत नाही. गाव पातळीवरील घटक पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते आपापल्या सवडीनुसार प्रचारात सहभाग घेत आहेत. गेल्या काही दिवसांपासून रणरणत्या उन्हामुळे तापमान चांगलेच तापले आहे, तुलनेने ‘इलेक्शन फिव्हर’ काही अद्याप दिसून येत नाही.

निवडणुकीचा प्रचार म्हटले की, उमेदवाराचा फलक व पक्षाचे झेंडे लावून दिवस भरात या गावातून त्या गावात धुरळा उडवत फिरणाऱ्या गाड्या. ‘इकडून आले, तिकडून आले’. ‘कोण आले रे कोण आले’. ‘ताई, माई अक्का, विचार करा पक्का’ अशी बेंबीच्या देठापासून घोषणाबाजी करणारे कार्यकर्ते, शहरी भागातील प्रचार सभा हे चित्र या निवडणुकीत दुर्मिळ झाल्याचे दिसून येत आहे. या निवडणुकीतील महायुती व महाविकास आघाडीचे दोन्हीही उमेदवार पिंपरी-चिंचवड शहरातील रहिवासी आहेत व दोघेही शिवसेनेच्या विभक्त झालेल्या दोन्ही गटांचे प्रतिनिधित्व करत आहेत.
मुळात मावळ तालुक्यात या दोन्ही गटांचा प्रभाव जेमतेम असल्याने या दोन्ही उमेदवारांना प्रचारासाठी घटक पक्षांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांवर अवलंबून राहावे लागत आहे. मावळ तालुक्यात प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेस व भाजप हे दोन प्रबळ पक्ष असून, त्या दोघांचेही उमेदवार नसल्याने व सद्यःस्थितीतील दोन्ही उमेदवार बाहेरचे असल्याने निवडणूक आठ दिवसांवर येऊनही तालुक्यात प्रचाराचा म्हणावा तितकासा जोर दिसून येत नाही. सोशल मीडियातील प्रचाराचीही वानवा दिसून येत आहे.
मावळ लोकसभा मतदारसंघ पिंपरी-चिंचवड शहरांसह इतर चार विधानसभा मतदारसंघात विस्तारलेला आहे. त्यात घाटाखालील तीन विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. मतदारसंघ भौगोलिकदृष्ट्या मोठा व अडचणीचा असल्याने व कालावधी कमी असल्याने दोन्ही उमेदवारांना ‘हाउस टू हाउस’ प्रचार करणे केवळ अशक्य आहे. त्यांचा मतदारसंघातील मोठ्या गावांमध्ये जेमतेम एक वेळ दौरा होऊ शकतो अशी स्थिती आहे. उन्हाचा कडाका अधिक असल्याने दुपारच्या वेळेत प्रचार करण्यावर मर्यादा पडत आहेत. त्यामुळे उमेदवारांना प्रचारासाठी घटक पक्षातील स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांवर अवलंबून राहावे लागत आहे.

कार्यकर्त्यांचे हातचे राखूनच काम !
घटक पक्षांच्या स्थानिक नेत्यांनीही बूथनिहाय व गाव पातळीवरील कार्यकर्त्यांवर आपापल्या गावातील प्रचाराची जबाबदारी सोपवली असून, हे कार्यकर्ते घरोघरी जाऊन उमेदवारांची परिचय पत्रके वाटपाचे काम करत आहेत. उमेदवारांनी खर्चासाठी हात आखडता घेतल्यास पदाधिकारी व कार्यकर्तेही हातचे राखूनच प्रचारात सहभाग दाखवत आहेत. आता कार्यकर्तेही ‘कमर्शिअल’ झाल्याने पदरमोड करून व वेळ खर्च करून प्रचारात सहभागी होण्यास नाखूष असतात. त्यात उमेदवार स्थानिक असल्यास प्रचारात रंगत तयार होते. आता शेवटच्या चार पाच दिवसांत काही मोठ्या सभांचे आयोजन झाल्यास खऱ्या अर्थाने निवडणुकीचा माहोल तयार होऊ शकेल.

‘निवडणूक म्हटली की, पूर्वी उत्सवासारखे वातावरण असायचे. आता ती मजा राहिली नाही. वैयक्तिक स्वार्थासाठी पुढारी रोजच्या रोज इकडून तिकडे बेडूक उड्या मारत असल्याने राजकारणाची खिचडी झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्य मतदारांचा निवडणुकीतील रस कमी झाला आहे. त्याचा भ्रमनिरास झाला आहे. राजकारण्यांवरील विश्वास कमी होत चालला आहे. कार्यकर्त्यांचाही हिरमोड झाला आहे.’
- सोपान शिंदे, ब्राम्हणवाडी

‘पूर्वी उमेदवाराचे नाव व त्याचे चिन्ह घरोघरी पोचविण्यासाठी मोठी कसरत करावी लागत होती. गाड्यांना स्पीकर लावून गावोगावी फिरावे लागत होते. आता परिस्थिती बदलली आहे. दिवसेंदिवस सोशल मीडियाचा वापर वाढल्याने आता प्रचाराची पद्धत बदलत चालली आहे. प्रत्येकाच्या हातात मोबाईल असल्याने त्याला पक्ष, उमेदवार व त्याच्या चिन्हा बाबत माहिती मिळत आहे. त्यामुळे पूर्वीच्या सारखा प्रचार करण्याची गरज राहिली नाही.’
- अविनाश वाळुंज, उर्से

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com