सरकारनामा दिवाळी अंकासाठी-मावळ पंचायत समिती आढावा
भाजपसमोर सत्ता राखण्याचे आव्हान
ग्रामीण भागात जिल्हा परिषद व पंचायत समिती या सत्ता केंद्राला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यातच साडेतीन वर्षे निवडणूक लांबल्यामुळे इच्छुकांची संख्या वाढली आहे. एका पंचवार्षिकचा अपवाद वगळता १९९२ पासून गेली तीस वर्षे मावळ पंचायत समितीवर भाजपची सत्ता असून गेल्या सहा वर्षांतील बदललेल्या राजकीय परिस्थितीत भाजप ही सत्ता कायम राखणार का? याबाबत मोठे औत्सुक्य आहे.
- ज्ञानेश्वर वाघमारे
---------------------
जि ल्हा परिषद व पंचायत समितीच्या इतिहासात ग्रामीण भागातील महत्त्वाचे सत्ता केंद्र असलेल्या पंचायत समितीवर सुरवातीची अनेक वर्षे पूर्वाश्रमीच्या काँग्रेसचे निर्विवाद वर्चस्व होते. १९९२ मध्ये पंचायत समितीमध्ये काँग्रेस व भाजप मध्ये समसमान बलाबल झाल्याने चिठ्ठ्या टाकून कौल घेण्यात आला. त्यात सभापती व उपसभापती या दोन्ही पदांचा कौल भाजपच्या बाजूने गेला. त्यानंतर १९९५ मध्ये विधानसभा निवडणुकीतही भाजपने बाजी मारली. त्यापुढील काळात या पक्षाचा यशाचा आलेख वाढतच गेला. जिल्हा परिषद गटांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने अनेकदा चांगली कामगिरी केली. मात्र, पंचायत समिती गणांमधील कामगिरीत भाजप सरस राहिला.
परिस्थितीत बदल
मावळ तालुक्यात १९९५ पासून सलग पंचवीस वर्षे भाजपचा आमदार होता. २०१९ च्या निवडणुकीत भाजपमधून बाहेर पडत विद्यमान आमदार सुनील शेळके यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी घेऊन मोठे यश संपादन केले. त्यांच्या रूपाने राष्ट्रवादी काँग्रेसला प्रथमच आमदारकी मिळाली. गेल्या निवडणुकीतही पक्षाने त्यांनाच दुसऱ्यांदा उमेदवारी दिली. त्यातही त्यांनी पहिल्यापेक्षा अधिक मतांनी विजय मिळवला. त्यांच्या कामाचा आवाका पाहून उपमुख्यमंत्री अजित पवार देखील प्रभावित झाले. त्यांच्यावर विश्वास टाकून पक्ष विस्तारासाठीही मोकळीक दिली. देहू नगरपंचायतीच्या निवडणुकीत त्यांच्याच नेतृत्वाखाली पक्षाला मोठे यश मिळाले.
सत्तांतरामुळे भाजप सक्रिय
२०१९ च्या निवडणुकीतील पराभवामुळे तालुक्यातील भाजप पक्ष बॅकफूटवर गेला. मात्र, राज्यात सत्तांतर झाल्यानंतर नेत्यांप्रमाणेच कार्यकर्त्यांनाही मोठा हुरूप आला. गेल्या सहा वर्षांत राष्ट्रवादी काँग्रेसमधून आलेल्या काही नेत्यांची व कार्यकर्त्यांची घरवापसी झाली तरी मूळच्या भाजपच्या कोणत्याही मोठ्या नेत्याने पक्ष त्याग केला नाही. निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही प्रमुख पदाधिकाऱ्यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
मतदार संघांमध्ये मोठे फेरबदल
नगरपंचायत अस्तित्वात आल्याने वडगाव शहर हे जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीतून बाहेर पडले आहे. त्यामुळे पूर्वीच्या पंचायत समिती मतदार संघांच्या रचनेत मोठे फेरबदल झाले आहेत. सभापतिपद इतर मागास प्रवर्ग महिलेसाठी आरक्षित झाले आहे. चांदखेड हा गण या वर्गासाठी राखीव असल्याने येथे उमेदवारीसाठी मोठी स्पर्धा होणार आहे. वराळे, इंदोरी, कुसगाव बुद्रूक या सर्वसाधारण मतदार संघात तसेच टाकवे बुद्रूक, कार्ला, काले या सर्वसाधारण महिलांसाठी राखीव असलेल्या जागेवरील उमेदवार ठरवतानाही मोठी कसरत करावी लागणार आहे. नाणे, खडकाळा व सोमाटणे या राखीव गणांमध्येही उमेदवारीसाठी स्पर्धा दिसून येत आहे.
शिवसेनेची अस्तित्वाची लढाई
राज्य पातळीवर शिवसेनेत व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर मावळ तालुक्यातही या दोन्ही पक्षांत गट पडले. या पक्षांसह शिवसेना, काँग्रेस व मनसेलाही या निवडणुकीत अस्तित्वाची लढाई करावी लागणार आहे. आमदार सुनील शेळके, माजी मंत्री बाळा भेगडे यांनी तळेगाव येथील कार्यक्रमात महायुतीचे संकेत दिले असले तरी उमेदवारीची स्पर्धा लक्षात घेता महायुती प्रत्यक्षात येणे कठीण आहे.
मागील निवडणुकीतील पक्षीय बलाबल
एकूण जागा - १०
भाजप - ६
राष्ट्रवादी काँग्रेस - ४

