

वडगाव मावळ, ता. २१ : मावळ तालुक्यातील प्रस्तावित उच्चदाब वीज वाहिनी प्रकल्पामुळे सुमारे वीस गावांतील शेतीचे मोठे नुकसान होणार असल्याने रयत प्रहार संघटनेने या प्रकल्पाला विरोध दर्शवला आहे. तसेच हा प्रकल्प तातडीने रद्द करण्याची मागणी केली आहे. याची दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.
संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भरत मोरे, पदाधिकारी गुलाब तिकोणे, सोनू खाडे, संतोष दळवी, राजू बेदमुथा आदींनी प्रांताधिकारी सुरेंद्र नवले यांची भेट घेऊन भूमिका मांडली. अंदर व नाणे मावळच्या साठ गावांमधून अतिउच्च दाबाची वीज वाहिनी जात आहे. त्यासाठी भले मोठे टॉवर उभारण्याचे काम सुरू आहे. हे काम सुरू करताना गावांतील शेतकऱ्यांना विश्वासात घेतले नाही. या प्रकल्पामुळे साठ गावांतील हजारो हेक्टर शेतजमीन नापीक होणार आहेत. टॉवर लाइनच्या जवळ व लाइन खालीही शेती पिकवता येणार नाही. तसेच उच्चदाब वीज वाहिनीमुळे शेतीकाम करताना शेतकऱ्यांच्या जीवितास धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. संघटनेने जमिनीच्या मोबदल्याबाबतही नाराजी व्यक्त केली असून, सध्याचा मोबदला अपुरा असल्याचे सांगितले.
शासन आणि संबंधित कंपनीने शेतकऱ्यांशी पूर्व चर्चा न करता काम सुरू करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप पदाधिकाऱ्यांनी केला. त्यामुळे तातडीने बैठक घेऊन मागण्यांवर निर्णय घ्यावा अन्यथा आंदोलनाचा मार्ग अवलंबण्यात येईल, असा इशारा पदाधिकाऱ्यांनी दिला. आमदार सुनील शेळके व माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनीही शेतकऱ्यांना पाठिंबा दिला आहे, अशी माहिती पदाधिकाऱ्यांनी दिली.
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.