होळ येथील रस्त्याच्या कामात विसंवाद

होळ येथील रस्त्याच्या कामात विसंवाद

Published on

वडगाव निंबाळकर, ता. ३० : होळ (ता. बारामती) येथील नीरा नदीजवळील पुलानजीक सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने सिमेंट काँक्रिट रस्त्याचे काम सुरू झाले आहे. परंतु या कामात गंभीर विसंवाद आणि नियोजनातील त्रुटी स्पष्ट होत असल्याने ग्रामस्थांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

वडगाव निंबाळकर (ता. बारामती) ते साखरवाडी (ता. फलटण) या मार्गावर होळ येथील नीरा नदीलगत सिमेंट रस्त्याचे काम सुरू आहे. महिन्यांपूर्वीच जिल्हा परिषदेच्यावतीने याच मार्गावर भूमिगत गटाराचे काम केले होते. १० लाख ५८ हजार ८८६ रुपयांचा निधी खर्च करून गटाराची पाइपलाइन टाकण्यात आली होती. परंतु सध्याच्या रस्त्याच्या कामात ही गटार व्यवस्था अडथळा ठरत असल्याने पाइपलाइन काढून टाकावी लागली. म्हणजेच नुकतेच झालेले काम पुन्हा उकरून टाकल्याने शासनाचा निधी अक्षरशः वाया गेल्याचे चित्र दिसत आहे.
भूमिगत गटाराचे काम सुरू असताना ग्रामस्थांनी याबाबत पंचायत समितीच्या पाणीपुरवठा विभागाकडे तक्रार दिली होती. संबंधित अधिकाऱ्यांनी येथे पाहणी करून काम सुस्थितीत असल्याचे सांगितले. जर या मार्गावर सिमेंट काँक्रिट रस्त्याचे काम आधीपासूनच मंजूर होते, तर त्याच काळात गटाराचे काम घाईघाईने का हाती घेण्यात आले? सार्वजनिक बांधकाम विभाग आणि जिल्हा परिषद या दोन शासकीय यंत्रणांमध्ये कोणताही समन्वय नसल्याने शासनाचा निधी दुहेरी पद्धतीने खर्च होऊन नागरिकांच्या पैशांची उधळपट्टी झाली आहे.
‘‘या प्रकरणात जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी, तसेच ठेकेदारांची भूमिकाही तपासली जावी,’’ अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य दीपक वाघ यांनी केली आहे.
शासनाच्या निधीचा गैरवापर करून नुकतेच झालेले गटारकाम उखडून टाकणे म्हणजे प्रशासनाच्या नियोजनशून्यतेचे उदाहरण, असे नागरिकांचे म्हणणे आहे. रस्त्याचे काम निःसंशय आवश्यक आहे; मात्र त्यासाठी पूर्वी झालेले गटारकाम वाया जाऊ नये, याची खबरदारी प्रशासनाने घेतली असती तर, अशा प्रकारचा निधी अपव्यय टाळता आला असता. आता जिल्हा परिषद आणि सार्वजनिक बांधकाम विभाग या दोन्ही यंत्रणांमधील जबाबदार अधिकाऱ्यांची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
भूमिगत गटाच्या कामाबाबत प्रीती गुंजाळ कनिष्ठ अभियंता ग्रामीण पाणीपुरवठा बांधकाम उपविभाग बारामती यांच्याशी संपर्क साधला असता हे काम गेल्या महिन्यात पूर्ण झाले आहे. कार्यालयीन वेळेत याबाबत अधिक माहिती मिळेल असे सांगितले.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, भूमिगत गटाच्या कामाची कोणतीही माहिती आमच्या विभागाला मिळाली नाही. ग्रामस्थांनी मुख्य रस्त्यावर काम करताना सार्वजनिक बांधकाम विभागाची परवानगी घेतली नाही.

रस्त्याच्या कामाबाबतही ग्रामस्थ अनभिज्ञ
सुरू असलेल्या कामाबाबत कामाच्या ठिकाणी कोणताही फलक नाही यामुळे कामाविषयी माहिती मिळू शकत नाही. कामाचा आराखडा आणि मिळालेला निधी याचा फलक माहितीसाठी लावला जावा अशी मागणी होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com