मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची शाळा पाहणी
वडगाव निंबाळकर, ता. ३ : कोऱ्हाळे बुद्रुक (ता. बारामती) येथे जिल्हा परिषदेच्या शाळेला पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी नुकतीच भेट देऊन मॉडर्न स्कूल अंतर्गत होणाऱ्या कामांचा आढावा घेतला. या वेळी महिला पालकांचा सक्रिय सहभाग पाहून पाटील यांनी समाधान व्यक्त केले.
महिलांचा अशा प्रकारे शाळेच्या कामकाजात सहभाग पाहून समाधान व्यक्त केले. माता पालकांशी विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेबाबत चर्चा केली. प्रत्यक्ष वर्गात जाऊन काही विद्यार्थ्यांना प्रश्न विचारून त्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेची तपासणी केली. विद्यार्थ्यांची तयारी व ज्ञान पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले.
या वेळी मुख्याध्यापक अशोक देवकर यांनी शाळेचा माहितीपट सादर केला. शाळेने स्वीकारलेल्या आधुनिक उपक्रमांची पाहणी करून पाटील यांनी शाळेसाठी संगणक लॅब व प्रयोगशाळा उभारणीसाठी निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले.
शाळेची इमारत जुनी असल्याने पुनर्विकासासाठी ४५ लाख रुपयांचा निधी मागितला होता. या संदर्भात प्रत्यक्ष पाहणी करून आवश्यक निधी किती असावा, याची तपासणी पाटील यांनी केली. मॉडर्न स्कूल योजनेत जागेनुसार योग्य ते बदल सुचवून त्यांनी शाळेला पुढील विकासासाठी मार्गदर्शन दिले.
याप्रसंगी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सतीश खोमणे, सोमेश्वर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष सुनील भगत, गटविकास अधिकारी किशोर माने, गटशिक्षण अधिकारी नीलेश गवळी, केंद्रप्रमुख गजानन गाढवे, ग्रामपंचायत अधिकारी राजेंद्र शिंदे आदी उपस्थित होते. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सचिन खोमणे यांनी उपस्थितांचे स्वागत केले.