शासकीय जागेला अतिक्रमणाचा विळखा
वडगाव निंबाळकर, ता. २६ ः वडगाव निंबाळकर (ता. बारामती) येथील पोलिस ठाण्यासमोर असलेल्या महसूल विभागाच्या मालकीच्या जागेत अतिक्रमणाचा विळखा दिवसेंदिवस वाढत आहे. मंडलअधिकारी कार्यालयाच्या प्रस्तावित जागेवर सुरू असलेल्या बेकायदेशीर बांधकामामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
संबंधित जागेवर महसूल विभागाने नियोजित मंडलाधिकारी कार्यालय व निवासस्थान असा स्पष्ट फलक लावला होता. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करीत काहींनी कच्चे शेड उभारणे, बांधकाम साहित्य साठवणे, असे प्रकार खुलेआम सुरू ठेवले आहेत. या अतिक्रमणाची माहिती महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना वेळोवेळी देण्यात आली. मात्र, कोणतीही कार्यवाही झाली नाही. फक्त बघ्याची भूमिका घेतल्यामुळे कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून काही अधिकाऱ्यांच्या आर्थिक हितसंबंधांमुळेच बांधकामे सुरू असल्याची स्थानिकांत चर्चा रंगू लागली आहे.
विशेष म्हणजे पोलिस ठाणे, पाटबंधारे विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, शासकीय निवासस्थान अशी अनेक सरकारी कार्यालय या परिसरात असूनही महसूल विभागाच्या जागेवर होत असलेल्या अनधिकृत बांधकामावर कोणतीही दखल घेतली जात नाही. निवडणुकीचा काळ असल्याने काही पदाधिकारी आपल्या कार्यकर्त्यांना मोकळीक देत आहेत. शासकीय अधिकारी निवडणूक कामात गुंतल्याचे पाहून सुट्टीच्या दिवशी सरकारी जागेत बांधकाम सुरू ठेवण्याचा सपाटा लावला आहे.
या जागेची तातडीने मोजणी करून सर्व अतिक्रमणे हटवावीत. संबंधित सरकारी जागा पूर्णपणे मोकळी करून नियोजित मंडलाधिकारी कार्यालय तलाठी कार्यालय व निवासस्थानाची उभारणी व्हावी, अशी मागणी नागरिक करीत आहे.
ग्रामपंचायतीच्या वतीने महसूल विभागाला अतिक्रमणाबाबत कळविले होते. तहसीलदारांच्या सूचनेनुसार ग्रामपंचायतीने संबंधित गट मोजणीसाठी नगर भूमापन कार्यालयाकडे पैसे भरले होते. मात्र, या जागेची हद्द निश्चित करून दिली गेली नाही. शासकीय विभाग एकमेकांवरची जबाबदारी झटकत असल्यामुळे सरकारी जागा संपुष्टात आली आहे. नवीन योजना राबवण्यासाठी गावाला सार्वजनिक जागा राहिली नाही. सरकारी अधिकारी अधिकाऱ्यांनी कडक धोरण राबवले तरच सरकारी जागा वाचणार आहेत.
- सुनील ढोले, सरपंच
या जागेचा पंचनामा करून शासकीय गट मोजणीबाबत अहवाल वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवला आहे. अतिक्रमण करणाऱ्या लोकांना नोटिसा दिल्या आहेत.
- गजानन पारवे, मंडल अधिकारी
02924
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

