कांबळेश्वर येथे जादूचे प्रयोग
वडगाव निंबाळकर, ता. २९ : कांबळेश्वर (ता. बारामती) येथील प्राथमिक शाळेच्या प्रांगणात शिवा काका कारंडे फाउंडेशनच्या वतीने जादूगार शिवम यांच्या जादूच्या प्रयोगांचा कार्यक्रम झाला. यासाठी परिसरातील लहान मुलांसह पालकांनी जादूचे प्रयोग पाहण्यासाठी गर्दी केली होती.
बालगंधर्व पुरस्कार व राष्ट्रीय पुरस्कार विजेते जादूगार शिवम यांनी मनोरंजनासोबतच समाजप्रबोधनाचा प्रभावी संदेश दिला. हातचलाखीच्या प्रयोगांतून देवाच्या नावाखाली जादूटोणा करणाऱ्या भोंदू बाबांकडून महिलांची कशी फसवणूक केली जाते, हे त्यांनी प्रत्यक्ष दाखवून महिलांमध्ये जागृती निर्माण केली. अशा फसवणूक करणाऱ्यांपासून सावध राहण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
अनेक वर्षांनंतर जादूगार गावात येणार असल्याची माहिती मिळताच मुलांमधून मोठी उत्सुकता होती थंडीचा कडाका असूनही मुलांनी आवडीने कार्यक्रम पाहून आनंद साजरा केला.
मनोरंजनातून प्रबोधन करावे, या उद्देशाने फाउंडेशन च्या माध्यमातून कार्यक्रमाचे आयोजन केल्याची माहिती अध्यक्षा रेणुका कारंडे यांनी दिली.
बारामती पंचायत समितीचे माजी सभापती करण खलाटे यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात केली. यावेळी विराज खलाटे, सौरभ खलाटे, नाना मदने, पोलिस पाटील, अक्षय तांबे, महेंद्र भंडलकर उपस्थित होते. अमर शिवाजी तरुण मंडळाच्या वतीने आयोजकांचा सन्मान केला.

