कायद्याबरोबरच पोलिसांनी जपली माणुसकी

कायद्याबरोबरच पोलिसांनी जपली माणुसकी

Published on

वडगाव निंबाळकर, ता. ९ ः वडगाव निंबाळकर (ता. बारामती) पोलिसांनी परिसरात वारंवार घडणाऱ्या शेळ्या- बोकड चोरीच्या घटनांचा यशस्वी छडा लावत चोरी करणाऱ्या टोळीला अटक केली. या प्रकरणात हस्तगत करण्यात आलेल्या शेळ्या- बोकडांना दोन दिवस पोलिस ठाण्यातच ठेवावे लागले. या काळात पोलिसांनी केवळ कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली नाही, तर त्या मुक्या जनावरांची जबाबदारीही आपुलकीने पार पाडली.
वडगाव निंबाळकर परिसरात शेळ्या- बोकड चोरीच्या वारंवार घटना घडत होत्या. याबाबत ‘सकाळ’मध्ये शेतकऱ्यांच्या पशुधनाची चोरी रोखण्यात पोलिसांना अपयश याबाबत वृत्त प्रसिद्ध करून या प्रश्नाकडे लक्ष वेधले होते. यामुळे चोरीचा तपास लावण्याचा चंग पोलिसांनी बांधला आणि अल्पावधीत चोरट्यांना गजाआड केले.
चोरीस गेलेला सर्व मुद्देमाल जप्त करून संबंधित शेतकरी व पशुपालकांना मोठा दिलासा देण्यात आला आहे. पोलिसांच्या तत्पर तपासामुळे परिसरातील नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना अधिक दृढ झाली आहे. हस्तगत केलेल्या शेळ्यांसाठी योग्य चारा- पाणी, सुरक्षित व्यवस्था आणि आवश्यक देखभाल करून पोलिसांनी माणुसकीचे दर्शन घडवले. जनावरांनाही काळजी आणि संरक्षणाची गरज असते, याची जाणीव या कृतीतून ठळकपणे दिसून आली.
तपास पूर्ण झाल्यानंतर गुरुवारी (ता. ८) रात्री सर्व तक्रारदारांना त्यांचा मुद्देमाल म्हणजेच शेळ्या- बोकड ओळख पटवून सुपूर्द करण्यात आले. चोरीचा गुन्हा उघडकीस आणण्याबरोबरच पोलिसांनी दाखवलेली संवेदनशीलता व सामाजिक बांधिलकी नागरिकांच्या मनात विश्वास निर्माण करणारी ठरली आहे.
वडगाव निंबाळकर पोलिसांचे हे कार्य केवळ गुन्हे उघडकीस आणण्यापुरते मर्यादित न राहता, समाजातील दुर्बल घटकांबद्दलची आपुलकी आणि जबाबदारी अधोरेखित करणारे आहे. कायदा अंमलबजावणीसोबतच माणुसकी जपणारे हे उदाहरण इतरांसाठी प्रेरणादायी ठरत असून, पोलिसांच्या सकारात्मक भूमिकेचे सर्वत्र कौतुक होत आहे.

मालकिणीच्या आवाजाने टवकारले कान
शेळ्या- बोकडांची ओळख पटवताना वाघळवाडी येथील महिलेने आपल्या शेळी आणि बोकडाला नावानिशी हाक मारली, त्याचबरोबर उठून पटकन जनावरे जवळ आली ही बाब उपस्थितांना भावली.

शेळी बोकड चोरीच्या प्रकरणात चोरटे जनावरांची विक्री लगेच करतात. यामुळे मुद्देमाल मिळून येत नाही परिणामी तपास अडचणीचा ठरतो. परंतु, चोरी झाल्यानंतर आमच्या पथकाने लगेच चोरट्यांचा पाठलाग करून सातारा जिल्ह्यातून शेळी- बोकड मिळवले. मुद्देमालासह चोरट्यांना पकडण्यात यश आले. चोरीला गेलेले पशुधन परत मिळवून दिल्याचे समाधान आम्हाला मिळाले.
- नागनाथ पाटील, सहाय्यक पोलिस निरीक्षक

02969

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com