वडगाव निंबाळकर येथे संक्रांतीनिमित्त फुलला आठवडे बाजार
वडगाव निंबाळकर, ता. ११ : मकरसंक्रांतीच्या पार्श्वभूमीवर वडगाव निंबाळकर (ता. बारामती) येथील आठवडे बाजार गर्दीने फुलून गेला. सुवासिनींसाठी लागणाऱ्या विविध वस्तूंची खरेदी करण्यासाठी बाजार महिलांनी गर्दी केली होती. संक्रांतीनिमित्त खास दुकाने थाटण्यात आली आहेत. ग्रामीण भागाचे अर्थकेंद्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या आठवडे बाजाराचे सणासुदीत आजही अनन्यसाधारण महत्त्व आहे.
संक्रांतीसाठी लागणाऱ्या कुंकू, हळद, तिळगूळ, डाळी, धान्य, रंगीबेरंगी बांगड्या, मातीच्या वाट्या, दिवे, कलश, तसेच पूजाविधीसाठी आवश्यक साहित्य मोठ्या प्रमाणावर विक्रीला आले आहे. सुवासिनींसह ग्रामस्थ बाजारात खरेदीसाठी गर्दी करत असून, व्यापाऱ्यांमध्येही उत्साहाचे वातावरण आहे. ग्रामीण महिलांची आवड आणि परंपरा लक्षात घेऊन विक्रेत्यांनी विविध प्रकारच्या वस्तू आकर्षक पद्धतीने मांडल्या आहेत.
आजचा आठवडे बाजार संक्रांतीपूर्वी अत्यंत महत्त्वाचा असल्याने ग्रामपंचायतीच्या वतीने आवश्यक त्या सुविधा व उपाययोजना केल्या आहेत. बाजार परिसरात स्वच्छता, वाहतूक नियोजन, पाणी व सुरक्षिततेची व्यवस्था केल्याची माहिती सरपंच सुनील ढोले यांनी दिली. त्यामुळे खरेदीसाठी आलेल्या नागरिकांना कोणतीही अडचण येऊ नये, याची दक्षता घेण्यात आली आहे.
परंपरा, श्रद्धा आणि ग्रामीण अर्थव्यवस्था यांचा संगम असलेला आठवडे बाजार संक्रांतीच्या निमित्ताने पुन्हा एकदा गजबजून गेला आहे. सणासुदीच्या या वातावरणामुळे बाजारात उत्साह, आनंद आणि चैतन्याची लहर पसरली असून, मकर संक्रांतीचा आनंद ग्रामस्थ साजरा करण्यासाठी सज्ज झाले आहेत.
संक्रांतीचे साहित्य प्रतिकिलो दर
घेवडा - ५० ते ६० रुपये पावटा ६० ते ७० रुपये वाटाणा ४० ते ५० घेवडा ६० ते ८० गाजर ४० ते ५० बोर ८० ते १०० गाजर ४० ते ५० वांगी ६० ते ८०
हरभरा जुडी वीस ते तीस रुपये असे विक्रीचे दर असल्याची माहिती विक्रेते सचिन संपत ओवाळ यांनी दिली.
सुवासिनींचे वाण म्हणून मकर संक्रांतीचे खण रंगीत स्वरूपात आले आहेत. साठ रुपये पाच नग एक पणती एक गुंडगी यामध्ये असते. पारंपरिक काळे खण आणि रंगीत याचा दोन्हीची मागणी समान असल्याची माहिती प्रदीप कुंभार यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

