

वडापुरी, ता. १० : ‘‘दुष्काळामुळे चालू गळीत हंगाम कमी कालावधीचा हंगाम असणार आहे. त्यामुळे ऊस उत्पादकांनी ऊसतोडीसाठी गडबड करू नये. चालू हंगामात कारखाना ऊस दरामध्ये मागे राहणार नाही तसेच वेळेवर ऊस बिल अदा केले जाईल. हार्वेस्टिंग प्रोग्रॅमप्रमाणे शेतकऱ्यांच्या सर्व उसाचे गाळप केले जाणार असून नीरा भीमा कारखान्यास सर्व ऊस देऊन सहकार्य करावे,’’ असे आवाहन
राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष तसेच नीरा भीमा सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक हर्षवर्धन पाटील यांनी केले.
शहाजीनगर (ता. इंदापूर) येथील कारखान्याचा सन २०२६-२७ च्या २६ व्या ऊस गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदीपन तसेच गळीत हंगामाचा प्रारंभ पाटील यांच्या हस्ते साधेपणाने संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कारखान्याच्या अध्यक्षा भाग्यश्री पाटील होत्या. यावेळी पाटील म्हणाले की, चालू ऊस गळीत हंगाम दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर आपण सर्वांना हा हंगाम एकजुटीने जास्तीत जास्त गाळप करून यशस्वी करावयाचा आहे.
यावेळी बॉयलर अग्निप्रदीपनानिमित्त सत्यनारायण पूजा, संचालक सुभाष गायकवाड व उज्ज्वला गायकवाड या उभयतांच्या हस्ते करण्यात आली. गव्हाण पूजन व काटा पूजन, संचालक विजयराव घोगरे व लतिका घोगरे या उभयतांच्या हस्ते संपन्न झाले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यकारी संचालक नवनाथ सपकाळ यांनी केले. या कार्यक्रमास माजी अध्यक्ष लालासाहेब पवार, विलासराव वाघमोडे, उदयसिंह पाटील, ॲड. कृष्णाजी यादव, शिवाजी हांगे, दत्तू सवासे, प्रतापराव पाटील, प्रकाश मोहिते, संजय बोडके, राजकुमार जाधव, विजय घोगरे, सुभाष गायकवाड, राजेंद्र देवकर, उमेश पाटील, महेशकुमार शिर्के, आनंदराव बोंद्रे, रामचंद्र नाईक, राहुल कांबळे, संगिता पोळ, कल्पना शिंदे, कार्यकारी संचालक नवनाथ सपकाळ, जयकुमार कारंडे, कांतीलाल झगडे, विकास पाटील, दत्तात्रेय शिर्के, धनंजय कोरटकर, राजेंद्र कोरटकर, शरद जगदाळे, विक्रम कोरटकर, अजित खबाले, अमरदीप कळकुटे, राजेंद्र गायकवाड, लक्ष्मण आसबे, ॲड. अनिल पाटील, सुरेश मेहेर, सुरेश जगदाळे, महावीर गांधी आदींसह शेतकरी, ऊसतोडणी वाहतूक कंत्राटदार, अधिकारी उपस्थित होते. कालिदास आवाड यांनी सूत्रसंचालन तर उपाध्यक्ष दादासाहेब घोगरे यांनी आभार मानले.
नीरा भीमा कारखान्याचे चालू गळीत हंगामामध्ये सहा लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट आहे. साखर उद्योगाला दिलासा मिळावा याकरिता केंद्र सरकारकडे साखरेची किमान विक्री किंमत प्रतिकिलोस रु. ५० करावी, अशी मागणी केली आहे. तसेच दुष्काळामुळे उसाचे उत्पन्न (टनेज) घटणार असून, साखर उताराही कमी येणार आहे. त्यामुळे सरकारने गाळप होणाऱ्या उसास प्रति टन रु. १ हजार अनुदान द्यावे.
- हर्षवर्धन पाटील, अध्यक्ष, राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ
03501