स्थानिक पातळीवर आघाडीची शक्यता
स्थानिक पातळीवर आघाडीची शक्यता
राजगड तालुका पंचायत समिती यावेळेस होणाऱ्या निवडणुकांमध्ये मोठी चुरशीच्या लढती होण्याच्या दाट शक्यता निर्माण झाली आहे. पक्षफुटीमुळे दोन राष्ट्रवादी, तसेच दोन शिवसेना, मनसे, भाजप व तालुक्यातील काँग्रेस पक्ष प्रत्येक जण उमेदवाराची चाचपणी करताना दिसून येत आहे. त्यामुळे उमेदवारांची संख्या वाढल्याने याचा फायदा नक्की कोणाला होईल किंवा स्थानिक पातळीवर होणाऱ्या आघाड्यांमुळे कोणत्या पक्षाला कसा फायदा होईल, याची राजकीय समीकरणे पक्षाचे पदाधिकारी आखताना दिसून येत आहेत.
- मनोज कुंभार, वेल्हे
राजगड पंचायत समितीच्या चार गणांसाठी आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर तालुक्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, गेल्या दहा वर्षांपासून माजी आमदार संग्राम थोपटे यांच्या मार्गदर्शनाखाली राजगड पंचायत समितीवर एक हाती काँग्रेसची सत्ता मिळवण्यात थोपटे यांना यश मिळाले होते. मात्र, विधानसभेत पराभूत झाल्यानंतर थोपटे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला, तर भोर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार शंकर मांडेकर यांनीसुद्धा राजगड पंचायत समितीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा फडकवण्याचा निर्धार केला आहे. त्यामुळे आजी- माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. मात्र, या दोघांनाही पक्षांतर्गत होणाऱ्या बंडखोरीला रोखत स्वतःचे वर्चस्व राखण्यात यश येणार का किंवा विचार मंथन होऊन स्थानिक पातळीवर काही आघाड्या होणार, याची उत्सुकता आहे. त्याचा नक्की फायदा कोणाला होणार, हे चित्र येणाऱ्या निवडणुकांच्या निकालांमधून स्पष्ट होईल.
राजगड तालुका पंचायत सभापतिपद हे सर्वसाधारण महिलेसाठी राखीव झाले आहे. पंचायत समितीमध्ये चार गण आहेत. यापैकी वेल्हे बुद्रुक गण नागरिकांचा मागास महिला प्रवर्गासाठी राखीव आहे, तर वांगणी व विंझर गणाचे आरक्षण सर्वसाधारण पदासाठी आहे. तर पानशेत गणासाठी सर्वसाधारण महिला आरक्षण पडले आहे. सद्यस्थतीला तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) व भाजप यांची मोठी ताकद आहे. त्यामुळे सर्वाधिक इच्छुक उमेदवारसुद्धा याच पक्षातून तिकिटांची मागणी करताना पक्षश्रेष्ठींकडे आहेत. त्यामुळे उमेदवार निश्चित करताना या दोन्ही पक्षांची दमछाक होईल, असे चित्र दिसून येत आहे.
वेल्हे बुद्रुक गणामधून माजी सभापती संगीता प्रकाश जेधे, रोहिणी देशमाने, छाया गोरड, भारती नगीने, निकिता पवार, सीता खुळे, रूपाली यादव, सविता राजीवडे, वैशाली पारठे, संध्या देशमाने, शीतल कोकाटे, कल्याणी धुमाळ या इच्छुक आहेत. तर, वांगणी गणामधून अशोक सरपाले, दत्ता पानसरे, विजय चोरघे, विशाल वालगुडे, प्रकाश बढे, दुर्गा चोरघे, केशव चोरघे, अशोक चोरघे, दत्ता चोरघे,दत्ता शेंडकर,उमेश नलावडे, अंकुश चोरघे, अंकुश दामगुडे, पुरुषोत्तम उफाळे, बाप्पू शिंदे हे इच्छुक आहेत. विंझर गणामधून रोहिदास शेंडकर, अशोक रेणुसे, गणेश जागडे, राजू रेणुसे, लक्ष्मण लेकावळे, शिवाजी शेंडकर, संतोष चोरगे, विनायक लिम्हण, गोपीनाथ रानवडे, योगेश लिमण, नीलेश चोरघे, उषा चोरघे हे इच्छुक आहेत. तर पानशेत गणामधून सुवर्णा राऊत, आशा पासलकर, प्रमिला पडवळ, धनश्री देवगिरीकर, सीमा राऊत, सुवर्णा राजीवडे, वैशाली घेटले, प्रगती घाडगे, मनीषा निवंगुणे, अंजली जागडे, स्नेहल ढेबे, केतकी कोकाटे या इच्छुक आहेत.
२०१७मधील पक्षीय बलाबल
काँग्रेस : ३ सदस्य
अपक्ष : १ सदस्य
स्थानिक प्रश्न
- रस्ते व आरोग्य सेवा
- जिल्हा परिषद शाळेतील गुणवत्तेबाबत प्रश्नचिन्ह
- रोजगार निर्मितीचा अभाव
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

