‘सोशल हंड्रेड’कडून शंभर विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती
वेल्हे, ता. १ : सोशल हंड्रेड फाउंडेशनच्या वतीने सुमारे शंभर (हंड्रेड) विद्यार्थ्यांना यावर्षी २५ लाख रुपयांची शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली आहे. फाउंडेशनच्या सुमारे दोन हजार सदस्यांनी जमा केलेल्या सामाजिक कृतज्ञता निधीतून ही शिष्यवृत्ती रविवारी (ता. ३०) अण्णाभाऊ साठे सभागृह पुणे येथे प्रदान करण्यात आली आहे.
राजगड तालुक्यातील युवकांनी सुमारे पाच वर्षांपूर्वी एकत्र येत सोशल मीडियाच्या माध्यमातून महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून सोशल हंड्रेड फाउंडेशनची स्थापना केली होती. गरीब, गरजू आणि गुणवंत विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी आर्थिक हातभार लावण्याच्या उद्देशाने या फाऊंडेशनची स्थापना केली होती. यावर्षी संस्थेने महाराष्ट्रातील वेगवेगळ्या ३५ क्षेत्रातील २००० पेक्षा अधिक सदस्यांच्या माध्यमातून सामाजिक कृतज्ञता निधी जमा केला होता. या निधीतून पाच जिल्ह्यातील सुमारे शंभर विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी २५ लाख रुपयांची शिष्यवृत्ती प्रदान केली.
याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून बीव्हीजी ग्रुपचे अध्यक्ष हनुमंतराव गायकवाड, प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त आणि भोई प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. मिलिंदजी भोई तर प्रमुख उपस्थितीत निवृत्त जिल्हा न्यायाधीश आर. बी. चोरघे पाटील, यांच्यासह महेंद्र साळुंखे बांधकाम व्यावसायिक मुंबई, शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी व त्यांचे पालक आदी उपस्थित होते.
उद्योजक बीव्हीजी ग्रुपचे अध्यक्ष गायकवाड यांच्या हस्ते पुणे येथील अण्णाभाऊ साठे सभागृहात रविवारी (ता. ३०) कार्यक्रम पार पडला. यावेळी या शिष्यवृत्तीचे विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते वाटप केल्याची माहिती सोशल हंड्रेड फाउंडेशनचे संस्थापक संतोष चोरघे यांनी दिली.
छत्रपती शिवरायांनी ज्या भूमीतून स्वराज्याची मुहूर्त मेढ रोवली त्या राजगड तालुक्याच्या मातीतील युवकांनी एकत्र येत छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, क्रांतिसूर्य महात्मा फुले व महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या विचाराने प्रेरित होऊन सोशल मीडियाच्या माध्यमातून सोशल हंड्रेड फाउंडेशन ही संघटना उभी केली आहे.
समाजातील आर्थिक दृष्ट्या कमकुवत परिस्थिती असणाऱ्या गुणवंत व प्रतिभावंत विद्यार्थ्यांना केवळ पैशांमुळे उच्च शिक्षण थांबू नये, म्हणून उच्चशिक्षित तरुणांनी एकत्र येत सुरू केलेल्या फाउंडेशनमध्ये दोन हजार पेक्षा अधिक सभासद असून हे सभासद प्रत्येक महिन्याला संघटनेच्या खात्यामध्ये दरमहा शंभर रुपये पाठवत असतात. त्यातूनच उपलब्ध होणाऱ्या सामाजिक कृतज्ञता निधीच्या माध्यमातून पुणे, नाशिक, नगर, सोलापूर, सातारा या पाच जिल्ह्यातील ९८ विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती प्रदान केली. यावेळी हनुमंतराव गायकवाड आणि समाजसेवक राष्ट्रीय युवा पुरस्कार प्राप्त मिलिंद भोई यांच्या हस्ते ९८ विद्यार्थ्यांना व्यावसायिक उच्चशिक्षणासाठी २५ लाख रुपये शिष्यवृत्तीचे वाटप केले.
ऋषिकेश डिंबळे यांनी सूत्रसंचालन केले. अनिल वाघ यांनी प्रास्ताविक केले. गणेश चोरघे यांनी आभार मानले.
● दृष्टिक्षेपात...
२०२१-२०२२ मध्ये ९ विद्यार्थ्यांना १.२९ लाख रुपये शिष्यवृत्ती
२०२२-२०२३ मध्ये २३ विद्यार्थ्यांना ४.५ लाख रुपये शिष्यवृत्ती
२०२३-२०२४ मध्ये ५१ विद्यार्थ्यांना १० लाख रुपये शिष्यवृत्ती
२०२४-२०२५ मध्ये ८४ विद्यार्थ्यांना १८ लाख रुपये शिष्यवृत्ती
२०२५-२०२६ मध्ये ९८ विद्यार्थ्यांना २५ लाख रुपये शिष्यवृत्ती
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

