तोरणा- राजगड परिसरात मधमाश्यांपासून सावधान

तोरणा- राजगड परिसरात मधमाश्यांपासून सावधान

Published on

मनोज कुंभार : सकाळ वृत्तसेवा
वेल्हे, ता. ५ : तोरणा व राजगड किल्ल्यावर, तसेच मढे घाट परिसरात पर्यटकांवर अलीकडच्या तीन महिन्यांमध्ये सुमारे 300 पेक्षा अधिक जणांवर मधमाश्यांच्या झालेल्या हल्ल्यांनी पर्यटकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. निसर्गाचा आनंद घेताना निसर्गाच्या मर्यादा पाळणे किती आवश्यक आहे, याचा गंभीर इशारा या घटनांनी दिला आहे. गड-किल्ले हे केवळ पर्यटनस्थळ नसून आपला ऐतिहासिक वारसा आहेत. निसर्गाशी संघर्ष न करता, निसर्गाचा आदर राखत पर्यटन करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. थोडीशी काळजी, संयम आणि शिस्त पाळल्यास अशा दुर्दैवी घटना टाळता येऊ शकतात.

निसर्गसौंदर्य, इतिहासाची साक्ष आणि साहसाचा थरार यांचा संगम असलेला वेल्हे तालुका दुर्गभ्रमंती व ट्रेकिंगप्रेमींसाठी नेहमीच आकर्षण ठरतो. स्वराज्याचे तोरण उभारलेला किल्ले तोरणा, स्वराज्याची पहिली राजधानी असलेला किल्ले राजगड आणि दुर्गमतेचा थरार अनुभव देणारा लिंगाणा किल्ला पाहण्यासाठी दरवर्षी हजारो इतिहासप्रेमी व पर्यटक येथे दाखल होतात. मात्र, या गड-किल्ल्यांवर वाढलेली पर्यटकांची गर्दी आणि निसर्गाच्या नियमांकडे होणारे दुर्लक्ष आता धोक्याचे ठरत आहे. त्यामुळे ट्रेकिंगसाठी जाताना कोणती काळजी घ्यायला हवी? मधमाशांचा हल्ला झाला तर काय करावे? काय करू नये? प्रशासनाने कोणत्या उपाययोजना कराव्यात? त्यातूनच पर्यटन व ट्रेकिंगचा खरा आनंद पर्यटकांना घेता येईल व पर्यायाने राजगड तालुक्यातील पर्यटन खऱ्या अर्थाने खुलेल.

मधमाश्यांचा हल्ला का होतो
मधमाशांची पोळी असणाऱ्या परिसरामध्ये पर्यटकांकडून होणारा हुल्लडबाजी, आरडाओरडा, दगडफेक, काठीने झाडे हलवणे, ध्वनीप्रदूषण, अत्तरचा वास, स्मोकिंग करणे, पालापाचोळा पेटवणे अथवा परिसरामध्ये चूल पेटवून धूर होणे तसेच ड्रोनचा वापर यामुळे मधमाश्या चिडतात आणि अचानक टोळीने हल्ला करतात. अनेक वेळा माहिती नसताना पर्यटक थेट पोळ्याजवळ जातात आणि धोका ओढवतो.

पर्यटकांनी कोणती काळजी घ्यावी?
*किल्ल्यावर जाताना गटाने आणि मार्गदर्शकाच्या सल्ल्यानेच प्रवास करावा
*आरडाओरडा, शिट्या, मोठ्या आवाजात संगीत टाळावे
*झाडे, दगड किंवा गुहा परिसरात छेडछाड करू नये
*मधमाश्यांचा थवा दिसल्यास तिथून शांतपणे दूर जावे, धावपळ करू नये
*चमकदार कपडे, तीव्र सुगंधाचे परफ्यूम वापरणे टाळावे
*लहान मुले, वृद्ध आणि अ‍ॅलर्जी असलेल्या व्यक्तींनी विशेष खबरदारी घ्यावी
* आपत्कालीन परिस्थितीत वनविभाग, स्थानिक ग्रामस्थ किंवा बचाव पथकांशी संपर्क साधावा

प्राथमिक उपचार
• मधमाशीचा हल्ला झाल्यानंतर त्वरित दिलेले प्राथमिक उपचार अत्यंत महत्त्वाचे ठरतात आणि गंभीर परिणाम टाळता येतात.
• मधमाशीचे विष अॅसिडिक स्वरूपाचे असल्यामुळे ट्रेकिंग किंवा दुर्गभ्रमंतीदरम्यान प्रत्येक ग्रुपकडे लिक्विड अमोनियाची छोटी बाटली असणे आवश्यक आहे.
• मधमाशीचा काटा साधारणपणे काळ्या रंगाचा असतो. मधमाशी चावल्यास हा काटा नखाच्या चिमटीत अलगद पकडून काढावा किंवा नखाने हलकेच खरडून बाहेर काढावा. यामुळे काटा तुटतो आणि त्यातील स्नायू कार्य करणे थांबतात, परिणामी विष शरीरात जाण्याचे प्रमाण कमी होते.
• काटा काढल्यानंतर त्या ठिकाणी लिक्विड अमोनियाचा एक थेंब टाकावा आणि नखाने हलकेच खरडावे. त्यामुळे औषध त्वचेत शोषले जाते व विष निष्प्रभ होण्यास मदत होते.
• लक्षणे वाढत असल्यास किंवा अनेक मधमाश्यांनी डंख मारल्यास विलंब न करता तातडीने वैद्यकीय मदत घ्यावी.

सरकारने कोणत्या उपाययोजना कराव्यात?
*पुरातत्व विभाग, स्थानिक महसूल विभाग आणि वनविभागाने
तातडीने ठोस पावले उचलण्याची गरज आहे.
*गडावर व गडाच्या खाली सुट्टीच्या अथवा गर्दीच्या दिवशी पुरातत्त्व विभागाचे कर्मचारी पोलीस, आरोग्य विभाग, वनविभाग व आपत्ती व्यवस्थापन टीमच्या सदस्यांची नेमणूक करणे अत्यंत महत्त्वाचे.
*किल्ल्यांवर धोकादायक ठिकाणी सूचना फलक आणि इशारे फलक लावावेत.
* मधमाश्यांच्या पोळ्यांची नियमित पाहणी व सुरक्षित व्यवस्थापन करावे.
*गर्दीच्या हंगामात प्रशिक्षित बचाव पथके आणि प्राथमिक उपचार सुविधा उपलब्ध कराव्यात.
* पर्यटकांसाठी जागृती मोहीम आणि मार्गदर्शक सूचना देणारी यंत्रणा उभारावी.
* अनधिकृत ड्रोन वापरावर कडक निर्बंध आणावेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com