कोदवडीत २५ गावांच्या संपर्क पुन्हा तुटला

कोदवडीत २५ गावांच्या संपर्क पुन्हा तुटला

Published on

वेल्हे, ता. २३ : कोदवडी (ता.राजगड) येथे स्थानिक व लोकप्रतिनिधींनी लोकसहभागातून येथील पुलाच्या बाजूने तयार केलेला कच्चा रस्ता शुक्रवारी (ता.२३) गुंजवणी धरणाच्या प्रकल्पातून केलेल्या विसर्गामुळे वाहून गेला. यामुळे परिसरातील २५ गावांच्या दळणवळणाचा संपर्क पुन्हा एकदा तुटला आहे.
कोदवडी ते पदबाबा मोरी रस्त्यावरील गुंजवणी नदीवर असणारा जुना लोखंडी पूल कोसळल्यानंतर परिसरातील नागरिकांना पर्यायी जवळचा मार्ग उपलब्ध नाही. त्यामुळे येथे पर्यायाची रस्ता तयार केला होता. तो विसर्गामुळे वाहून गेल्याच्या घटनेमुळे परिसरातील नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया देत आगामी येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकी मतदानावर बहिष्कार घालण्याचा इशारा दिला आहे.
कोदवडीच्या लोखंडी पुलावर २० डिसेंबर २०२५ रोजी अवजड वाहनामुळे पूल कोसळला. यामुळे २५ पेक्षा अधिक गावांचा वाहतुकीचा जवळचा संपर्क तुटला गेला होता. यामुळे परिसरातील विद्यार्थी कामगार शेतकऱ्यांना तसेच ज्येष्ठ नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागले होते. प्रशासनाकडून कोणतीही ठोस उपाययोजना होत नसल्याचे जाणवल्यानंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून परिसरातील नागरिकांनी व लोकप्रतिनिधींनी लोकसहभाग व स्वखर्चातून पडलेल्या पुलाच्या बाजूनेच एक कच्चा मार्ग तयार केला होता. यामुळे परिसरातील नागरिकांची येण्या-जाण्यापूर्ती तात्पुरती सोय होत होती. मात्र, २२ जानेवारी रोजी गुंजवणी धरणातून रब्बी हंगामासाठी गुंजवणी धरणाच्या विद्युत गृहाद्वारे २५० क्यूसेक विसर्ग नदीपात्रात सुरू केला होता. पाण्याच्या प्रवाहामुळे तात्पुरता तयार केलेला कच्चा रस्ता वाहून गेला आणि पुन्हा एकदा या परिसरातील नागरिकांची गैरसोय झाली. यामुळे संतप्त झालेल्या परिसरातील नागरिक व सोंडे सरपालेचे सरपंच प्रकाश बढे, सोंडे हिरोजीचे सरपंच बाळू जाधव, सोंडे कार्ले सरपंच युवराज काले॔, हनुमंत कार्ले, सुरवडचे सरपंच अशोक सरपाले,निवृत्त जिल्हा बँक व्यवस्थापक सर्जेराव सरपाले, वडगाव झांजेच्या सरपंच रूपाली झांजे, मंजाई आसनी माजी सरपंच विश्वास दामगुडे, अमित माने परिसरातील नागरिकांनी पूल दुर्घटनेनंतर परिसरातील नागरिकांची कोणतीही ठोस पर्यायी व्यवस्था न केल्याने संताप व्यक्त करत येणाऱ्या आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी होणाऱ्या मतदानावर बहिष्कार घालण्याचा इशारा दिला आहे.

प्रशासनासह लोकप्रतिनिधी तितके जबाबदार
सोंडे परिसरातील गावांना जाण्यासाठी महत्त्वाचे मार्ग असणारे तांभाड ते चिरमोडी मार्ग तर आंबवणे ते सोंडे सरपाले मार्ग, घावर ते भागीनघर मार्ग चिरमोडी ते भागीनघर मार्गाची या सर्व मार्गाची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाल्याने या परिसरातील नागरिकांना कोणी वाली आहे का असा प्रश्न संतप्त नागरिकांनी करत वर्षानुवर्षे रस्त्याच्या दुरवस्थेमुळे नागरिकांच्या होणाऱ्या ससे होलपटीला प्रशासनासह लोकप्रतिनिधी तितके जबाबदार असून येणाऱ्या निवडणुकीमध्ये मतदानावर बहिष्कार घालण्याचा इशारा दिला आहे.
03458

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com