राजगड तालुक्यातील नेत्यांचे श्रद्धांजलीवेळी डोळे पाणावले
वेल्हे, ता. ३० : ‘‘जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये अजितदादांनी २९ जानेवारी रोजी भोर विधानसभा मतदारसंघांमध्ये एकाच दिवशी हिंजवडी, पिरंगुट, राजगड, कापूरहोळ व भोर येथे सभा आयोजित करण्यासाठी तारीख व वेळ निश्चित केली होता. मात्र, त्यांनी वेळ पाळली नाही. प्रत्येक ठिकाणी वेळेवर पोचणारा लोकनेता चुकीचे वेळी गेला व सभेच्या कालावधीमध्येच दादांना श्रद्धांजली देण्यासाठी शोकसभेचे आयोजन करण्यात आले,’’ असे सांगत आमदार शंकर मांडेकर यांच्यासह राजगड तालुक्यातील कार्यकर्त्यांना अश्रूंचा बांध फुटला.
राजगड तालुक्यातील कोंढावळे फाटा येथे अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी सर्वपक्षीय शोकसभेचे शुक्रवारी (ता. ३०) आयोजन केले होते. यावेळी आमदार मांडेकर म्हणाले, ‘‘राजगड तालुका अनेक वर्षापासून विकासाबाबत वंचित आहे. लोकसंख्येने कमी असला तरीही ऐतिहासिक दृष्टिकोनातून या तालुक्याला मोठे महत्त्व असल्याचे सांगत अजित पवारांनी राजगड तालुक्याच्या नामांतराबरोबरच विकासाचे आराखडे तयार केले होते, मात्र दादा गेल्याने राजगड तालुक्याच्या विकासाला खीळ बसणार आहे.’’
यावेळी सर्वच पक्षातील तालुकाप्रमुखांनी व कार्यकर्त्यांनी अजितदादांसोबतच्या असणाऱ्या आठवणी सांगितल्या. कामाचा माणूस गेल्याची खंत व्यक्त करत अनेकांचे डोळे पाणावले, तर अनेकांनी भाषण सुरू असतानाच हुंदके देत भाषण पूर्ण केले, तर काहींनी भाषण थांबवले.
यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष किरण राऊत, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष शंकरराव भुरुक, मनसेचे तालुकाध्यक्ष दिगंबर चोरघे, भाजपचे तालुकाध्यक्ष राजू रेणुसे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुकाप्रमुख उमेश नलावडे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख शेंडकर, वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष बापू शिंदे, रिपब्लिकन पक्षाचे तालुकाध्यक्ष कुंदन गंगावणे, माजी सभापती निर्मला जागडे, राजगड कारखान्याच्या संचालिका शोभाताई जाधव, राष्ट्रवादीच्या महिला तालुका अध्यक्ष कीर्ती देशमुख, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या युवती जिल्हाध्यक्ष दुर्गा चोरगे, मोनिका बांदल यांच्यासह तालुक्यातील सर्वपक्षीय कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती. ज्येष्ठ वकील ॲड. एन. डी. धायगावे पाटील यांनी सूत्रसंचालन केले. बाळकृष्ण महाराज दसवडकर यांनी आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

