
अभ्यासू व्यक्तिमत्त्व : प्रशांतदादा काटे
इंदापूर तालुक्यातील भवानीनगर येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष प्रशांतदादा काटे हे शांत, संयमी व अभ्यासू नेतृत्व म्हणून ओळखले जात असून, प्रतिकूल परिस्थितीमध्ये छत्रपती कारखाना अडचणींमधून बाहेर काढून कारखान्याला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत.
-
छत्रपती साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रशांतदादा काटे यांचा जन्म ८ मार्च १९७२ रोजी झाला. बारामती तालुक्यातील काटेवाडी हे प्रशांतदादा यांचे गाव आहे. त्यांचे आजोबा स्वर्गीय पंढरीनाथ साहेबराव काटे हे श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळामध्ये कार्यरत होते. वडील तुळशीदास पंढरीनाथ काटे
यांची प्रगतशील बागायतदार म्हणून ख्याती आहे. दादांना घरातून समाजकारण व राजकारणाचे बाळकडू मिळाले. संयमी व नवनवीन संकल्पनांची माहिती घेऊन ती आत्मसात करण्याचा त्यांचा अभ्यासू वृत्तीचा स्वभाव आहे. याचा फायदा त्यांना कारखाना चालविताना होत आहे.
देशाचे माजी कृषिमंत्री मा. शरदचंद्रजी पवारसाहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा पवारसाहेब, खासदार सुप्रियाताई सुळे व बारामती टेक्सस्टाईलच्या अध्यक्षा सौ. सुनेत्रावहिनी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी सामाजिक व राजकीय कार्यक्षेत्रामध्ये स्वतःला झोकून दिले आहे. तसेच, पवार कुटुंब व राज्यमंत्री दत्तात्रेयमामा भरणे यांच्या मार्गदर्शनाखाली ते कारखान्याचा कारभार पाहत असून, कारखान्याला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी त्यांचा प्रयत्न आहे. कारखान्याचे उपाध्यक्ष अमोल पाटील यांच्यासह सर्व संचालक, प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी कामगार यांना बरोबर घेऊन कारखान्याला प्रगतिपथावर नेण्यासाठी त्यांचा प्रयत्न आहे.
छत्रपती कारखान्याचा चेअरमन होण्याचा बहुमान प्रशांतदादा यांच्यातील नेतृत्व गुण ओळखून अजितदादा पवार यांनी २४ जानेवारी २०११ रोजी दिली. या हंगामामध्ये कारखान्याला अतिरिक्त उसाचा गंभीर प्रश्न भेडसावत होता. सर्व सभासद परीसरातील शेतकरी त्रासले होते. अशावेळी प्रशांतदादा यांनी उपलब्ध उसाचे योग्य नियोजन करून शेजारील तालुक्यातील सहकारी व खासगी कारखान्याने ऊस गाळपासाठी दिल्यामुळे अतिरिक्त उसाचा प्रश्न मार्गी लागला. यामुळे सभासदांचे मोठे नुकसान टळले होते.
अजितदादांनी ११ डिसेंबर २०१८ रोजी प्रशांतदादा यांना दुसऱ्यांदा कारखान्याच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली. या वेळी कारखान्याची विस्तारवाढ झाली होती. या हंगामामध्ये कारखान्याने ८ लाख ९६ हजार ६२० टनाचे गाळप केले. सन २०१९-२० च्या गळीत हंगामामध्ये २०११ च्या अध्यक्षपदाच्या वेळी असणारी परिस्थिती सन २०१९-२० मध्ये विरुद्ध होती. यावेळी दुष्काळामध्ये कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये उसाचे क्षेत्र कमी झाले होते. तसेच, ऊस तोडणी यंत्रणाही कमी आली होती. यावरती दादांनी मात करून ४ लाख १७ हजार ४२५ टन उसाच्या गाळ्याचा टप्पा गाठला होता. सन २०२१-२१ ला कारखान्याने इतिहासामध्ये सर्वाधिक गाळप केले. साडेबारा लाख टनाचा टप्पा पार करून नवीन इतिहास रचला. चालू हंगामामध्येही कारखान्याने गाळपामध्ये भरारी घेतली असून साडेआठ लाख टनाचा टप्पा पूर्ण केला आहे.