इंदापूरच्या पश्चिम भागात डीजे विरहित मिरवणूक
वालचंदनगर, ता. ८ : इंदापूर तालुक्याच्या पश्चिम भागामधील ३९ गावामध्ये गणपती विसर्जन मिरवणुका वालचंदनगर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक राजकुमार डुणगे यांच्या कर्तव्यदक्षपणामुळे डीजे विरहित व वेळेत पार पडल्या. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
डुणगे यांनी पोलिस ठाण्याचा पदभार स्वीकारल्यानंतर बेकायदेशीर कृत्याच्या विरोधात धडक कारवाईची मोहीम सुरू केली आहे. त्यांनी गणेशोत्सवापूर्वी ३९ गावातील मंडळाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक घेऊन डीजे विरहित मिरवणुका काढण्याच्या सूचना केल्या होत्या. तसेच मोठ्या आवाजाचा डीजे लावल्यास कारवाई करण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे तालुक्याच्या पश्चिम भागातील वालचंदनगर, कळंब, भवानीनगर, सणसर, जंक्शन,अंथुर्णे, बोरी गावासह इतर गावातील मिरवणुका शांततेत पार पडल्या. यापूर्वी गावोगावी गणपती मंडळांची मोठ्या आवाजाचा डीजे लावण्यासाठी चढाओढ सुरू असायची. मात्र यंदा पहिल्यांदाच मिरवणुका डीजे विरहित पार पडल्या.
नागरिकांनी घेतला मिरवणुकीचा आनंद
नागरिकांना डीजेचा त्रास सहन करावा लागत होता. आजारी व्यक्ती व लहान मुलांच्या आरोग्यावर डीजेचा गंभीर परिणाम होत असल्यामुळे सार्वजनिक मंडळांना डीजे विरहित मिरवणुका काढण्याची सूचना केली होती. मंडळांनी सूचनांची अंमलबजावणी केल्याने शांततेमध्ये व वेळेत मिरवणुका पार पडल्या. पारंपारिक वाद्य लावल्यामुळे नागरिकांना मिरवणुकीचा आनंद घेता आला असल्याचे डुणगे यांनी सांगितले.